स्मार्ट सिटी बस चालकाला मारहाण, कर्मचाऱ्यांचा चक्काजाम, दोषींवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST2021-02-05T04:16:24+5:302021-02-05T04:16:24+5:30
औरंगाबाद : सिडको बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर एका रिक्षाचालकाने स्मार्ट सिटी बसचालकाला मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी ६.३० च्या सुमारास ...

स्मार्ट सिटी बस चालकाला मारहाण, कर्मचाऱ्यांचा चक्काजाम, दोषींवर गुन्हा दाखल
औरंगाबाद : सिडको बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर एका रिक्षाचालकाने स्मार्ट सिटी बसचालकाला मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी ६.३० च्या सुमारास घडली. त्यानंतर संतप्त बसचालकांनी एकत्र येत चक्काजाम करून ठिय्या आंदोलन सुरू केले. दोषी रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बससेवा सुरळीत झाली.
मुकुंदवाडी आगारातून सिडको बस स्थानकात रविवारी सकाळी ६.३० वाजता रांजणगावला जाणारी स्मार्ट सिटी बस दाखल होत होती. त्याचवेळी प्रवेशद्वारासमोर एक रिक्षा आडवी आली. तेव्हा बसचालकाने रिक्षा हटवण्याची सूचना केली. यावरून झालेल्या वादात रिक्षाचालकाने शहर बसचालकाला मारहाण केली. ही बाब समजताच सिडको बसस्थानकातून जाणाऱ्या सर्व सिटीबस स्थानकात उभ्या करण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक बसचे व्यवस्थापक प्रशांत भुसारी तेथे दाखल झाले. त्यांनी रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले. त्यानंतर सर्व बसचालकांनी कामबंद आंदोलन मागे घेत १० वाजल्यापासून बससेवा सुरू केली.
रिक्षाचालक अटकेत
बसचालकास मारहाण करणारा रिक्षाचालक जफर खान (२३, रा. नारेगाव) याच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काही तासांतच पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर देखील केले. रिक्षाचालकाला २८ जानेवारीपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. घटनास्थळी चार रिक्षाचालक होते. उर्वरित तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.
रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे
शहरात रिक्षांची संख्या वाढली आहे. आरटीओ व पोलीस प्रशासनाने त्यांना नियमांप्रमाणे वाहतूक करण्यास भाग पाडले पाहिजे. नियमाप्रमाणे एका रिक्षाथांब्यावर दहाच रिक्षा पाहिजेत. मात्र, सिडको बसस्थानक, बाबा पेट्रोल पंप, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन या परिसरात तर रिक्षांची संख्या मोठी असते.
- प्रशांत भुसारी, स्मार्ट बस विभागाचे मुख्य व्यवस्थापक.