गुळ पावडर प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा
By Admin | Updated: February 12, 2015 00:56 IST2015-02-12T00:48:51+5:302015-02-12T00:56:57+5:30
लातूर : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रेरणेतून केंद्रे अॅग्रो इंडस्ट्रीजचा साकारलेला गुळ पावडर प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणारा आहे,

गुळ पावडर प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा
लातूर : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रेरणेतून केंद्रे अॅग्रो इंडस्ट्रीजचा साकारलेला गुळ पावडर प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणारा आहे, असे मत भाजपाच्या युवा नेत्या अॅड. यशश्री मुंडे यांनी येथे व्यक्त केले.
रेणापूर तालुक्यातील कारेपूर येथे केंद्रे अॅग्रो इंडस्ट्रीजच्या गुळ पावडर प्रकल्पाचा प्रारंभ प.पू. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि अॅड. यशश्री मुंडे यांच्या हस्ते बुधवारी गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. मंचावर पन्नगेश्वरचे चेअरमन किशनराव भंडारे, ‘वैद्यनाथ’चे कार्यकारी संचालक सी.ए. कुलकर्णी, सचिन शिंदे, श्रीनिवास सुमित, त्रिंबक गुट्टे, नवनाथ भोसले, अशोक केंद्रे, सुरेश लहाने, संपत कराड, रविकांत औसेकर, विठ्ठलराव तांदळे, जयप्रकाश हलकुडे आदींची उपस्थिती होती. यावेळी अॅड. यशश्री मुंडे म्हणाल्या, दुष्काळी परिस्थिती असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी अवघ्या चार महिन्यांत हा गुळ पावडर प्रकल्प उत्तमरीत्या चालवून शेतकऱ्यांना चांगला भाव देण्याचा प्रयत्न करेल. गोपीनाथराव मुंडे यांनी राजकारणाबरोबर उद्योग निर्मिती केली. त्यामुळे राज्यात अनेक कारखाने उभारले. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळाला, ही मोठी प्रगती आहे. केंद्रे गुळ पावडर प्रकल्प शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असून, तो ‘पन्नगेश्वर’चा घटक आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेती उत्पादनावर आधारित इतर उपपदार्थांची निर्मिती करावी, अशी अपेक्षाही अॅड. यशश्री मुंडे यांनी व्यक्त केली. विजय केंद्रे यांचा गुळ पावडर प्रकल्प शेतकऱ्यांना दिलासा देईल, असा आशिर्वाद प.पू.डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी दिला. इंडस्ट्रीजचे संस्थापक विजय केंद्रे, वसंत दहिफळे, राम केंद्रे, संजय केंद्रे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.