जिल्ह्यातले लघु, मध्यम प्रकल्प कोरडेठाक
By Admin | Updated: July 29, 2015 00:49 IST2015-07-29T00:42:43+5:302015-07-29T00:49:29+5:30
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पासह जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून

जिल्ह्यातले लघु, मध्यम प्रकल्प कोरडेठाक
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पासह जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, काही प्रकल्पांत असलेल्या मृत साठ्यावर आणि अधिग्रहण केलेल्या ८५८ विहिरी व विंधन विहिरींवर सध्या तहान भागविली जात आहे़ जिल्ह्यात ८ मध्यम, १२९ लघु आणि २ मोठे प्रकल्प आहेत़ या प्रकल्पांत पाण्याचा मृत साठाही नाही़ चर खोदून जेमतेम पाणी घेतले जात आहे़ शिवाय, जिल्हा परिषदेकडे असलेल्या १४ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे स्त्रोतही आटले आहे़ त्यामुळे या योजना असुनही नसल्यासारख्याच आहेत़ लातूर शहरासह अहमदपूर, निलंगा, उदगीर, जळकोट, रेणापूर, चाकूर, देवणी, शिरुर अनंतपाळ आणि औसा या मोठ्या शहरांत पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे़
लातूर जिल्ह्यात तावरजा, रेणापूर, व्हटी, तीरु, देवर्जन, साकोळ, घरणी, मसलगा या आठ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे़ या प्रकल्पांवर अनेक गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत़ परंतू रेणापूर तालुक्यातील रेणा आणि उदगीर तालुक्यातील देवर्जन प्रकल्प वगळता हे सहाही प्रकल्प कोरडेठाक आहेत़ त्यामुळे या प्रकल्पांतून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे़ शिवाय, १२९ मध्यम प्रकल्पही कोरडेच आहेत़
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात शुन्य टक्के पाणीसाठा आहे़ चर खोदून मृत साठ्यातले पाणी पंप लाऊन काढले जात आहे़ त्यामुळे शहरात तीव्र पाणटंचाई आहे़ शिवाय, निम्न तेरणा प्रकल्पही कोरडा पडला आहे़ त्यामुळे औसा व निलंगा शहरात या प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा ठप्प आहे़ निम्न तेरणा प्रकल्पातून ३० खेडी, १० खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा औसा शहरासाठी आहे़ तसेच ६ खेडी योजनाही या प्रकल्पातून आहे़ परंतु या प्रकल्पात पाणीच नसल्यामुळे या योजना बंद पडल्या आहेत़ जिल्ह्याच्या पाणीपुरवठा विभागाने अधिग्रहण केलेल्या विहिर व विंधन विहिरीवर मदार आहे़ तसेच पाणी विकत घेऊन तहान भागविली जात आहे़ पाऊस नसल्याने गतवर्षी आणि यंदा निम्न तेरणा प्रकल्पात पाणी स्थिरावले नाही़ त्यामुळे या प्रकल्पावरील कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठ्याच्या योजना बंद पडल्या आहेत़