कडासमोरील झोपा काढा आंदोलन सुरूच

By Admin | Updated: November 5, 2014 00:59 IST2014-11-05T00:41:47+5:302014-11-05T00:59:23+5:30

औरंगाबाद : आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी झोपा काढा आंदोलन सुरू केले आहे

Slow movement in front of the edges continues the movement | कडासमोरील झोपा काढा आंदोलन सुरूच

कडासमोरील झोपा काढा आंदोलन सुरूच


औरंगाबाद : आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (कडा) कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन आज सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरूच राहिले. जायकवाडीतून दोन्ही बंधाऱ्यांत पाणी सोडण्याचा निर्णय होईपर्यंत माघार घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केले.
आपेगाव आणि हिरडपुरी बंधारे यंदा पावसाळ्यानंतरही रिकामेच आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी अडचणीत आले आहेत. म्हणून या बंधाऱ्यांमध्ये जायकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत आहे; परंतु त्याबाबत निर्णय होत नसल्यामुळे जायकवाडी पाणी शेतकरी संघर्ष कृती समितीने सोमवारपासून जलसंपदा विभागाच्या निषेधार्थ कडा कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन सुरू केले आहे. काल दिवसभर शेकडो शेतकरी दिवसभर आणि रात्रीही कडा कार्यालयाच्या प्रवेशद्वारात अंथरूण टाकून झोपले. मोहरमनिमित्त सार्वजनिक सुटी असल्यामुळे आज कडा कार्यालय बंद होते; पण तरीही शेतकऱ्यांनी त्यांचे आंदोलन सुरूच ठेवले. दरम्यान, दिवसभरात गेवराईचे आमदार पवार यांच्यासह अनेकांनी कडा कार्यालयात येऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी आ. पवार यांनी जलसंपदामंत्री पंकजा पालवे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलकांच्या मागणीची माहिती दिली. तसेच याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली.
जलसंपदा विभागाकडून आज दिवसभरात कोणतीही कारवाई न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आज मंगळवारी रात्रीही शेतकरी कडा कार्यालयासमोरून हलले नव्हते. या आंदोलनात जयाजीराव सूर्यवंशी, ज्ञानेश्वर औटे, संभाजी काळे, अच्युत औटे, आजमल पठाण, मगबूल पठाण, रामकिसन भावले, किशोर दसपुते, नीलेश दसपुते, सुभान पठाण, महादेव गोर्डे, शंकर गोर्डे, नारायण जाधव, बाळासाहेब जाधव, प्रदीप खरात, सलीम पठाण, अप्पासाहेब भावले, पांडुरंग लांडगे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत.
आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे जायकवाडीतून पाणी सोडावे यासाठी जलसंपदा विभागाकडे आम्ही महिनाभरापासून पाठपुरावा करीत आहोत. सुदैवाने यंदा जायकवाडीत पाणी आहे; परंतु तरीही निर्णय होत नाही. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने निर्णय घ्यावा; अन्यथा दुपारनंतर आंदोलनाचे स्वरूप बदलून हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असे जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले.

Web Title: Slow movement in front of the edges continues the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.