जिवंत साठ्याकडे संथ वाटचाल
By Admin | Updated: July 29, 2016 01:07 IST2016-07-29T00:55:07+5:302016-07-29T01:07:55+5:30
औरंगाबाद : पाणलोट क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे

जिवंत साठ्याकडे संथ वाटचाल
औरंगाबाद : पाणलोट क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात धरणाच्या मृतसाठ्यात २५७ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. तरीदेखील मृतसाठ्यातील संपूर्ण तूट भरून निघण्यासाठी आणखी २३ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे. त्यानंतरच धरणाच्या जिवंत साठ्यात पाणी भरण्यास सुरुवात होईल. जुलै महिना संपत आला तरी मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण मृतसाठ्यातच आहे. यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच धरणातील जिवंत साठा पूर्णपणे संपला होता. तेव्हापासून पिण्यासाठी आणि उद्योगांसाठी धरणाच्या मृतसाठ्यातून पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या मृतसाठ्याची पातळीही २६५ दलघमीने घटली होती. मात्र, जुलै महिन्यात सातत्याने पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे धरणात नियमितपणे पाण्याची आवक होत आहे. महिनाभरात धरणात २५७ दलघमी पाण्याची आवक झाली आहे; पण तरीदेखील हे धरण जिवंत साठ्यात आलेले नाही. धरणाच्या मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी आहे. गुरुवारी सकाळपर्यंत मृतसाठ्यातील पातळी ७१५ दलघमीपर्यंत पोहोचली. कडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणात गेल्या चोवीस तासांत १२ दलघमी पाण्याची आवक झाली. परिणामी मृतसाठ्यातील पातळी ७१५ दलघमीपर्यंत आली. मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी अजूनही २३ दलघमीची गरज आहे.