पाच दिवस चालणार तुळजाभवानीची निद्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 00:05 IST2016-10-13T00:02:09+5:302016-10-13T00:05:01+5:30
तुळजापूर : शारदीय नवरात्र महोत्सवातील देवीचे सीमोल्लंघन होऊन देवीची मंचकावर श्रमनिद्रा सुरू झाली.

पाच दिवस चालणार तुळजाभवानीची निद्रा
तुळजापूर : शारदीय नवरात्र महोत्सवातील देवीचे सीमोल्लंघन होऊन देवीची मंचकावर श्रमनिद्रा सुरू झाली. सदरची निद्रा पाच दिवस म्हणजे रविवारच्या मध्यरात्रीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर रविवारी पहाटेच्या सुमारास देवीची श्रमनिद्रा संपून सिंहासनावर पूर्व प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, त्यानंतर देवीच्या अश्विन पौणिमा यात्रेस प्रारंभ होणार आहे.
श्री तुळजाभवानी माता ५१ शक्तीपीठापैकी एक परिपूर्ण शक्तीपीठ आहे. त्यामुळे देशातून विविध जाती, धर्माचे, पंथातील भाविक देवीच्या दर्शनास येतात. समाजातील अठरा जाती, पगडींच्या लोकांची ती कुलदैवत आहे. त्यामुळे याठिकाणी ओटीभरण, अभिषेक, परडीभरण, जावळ, जागरण गोंधळ, कुंकवाचा सडा, दंडवत, सिंहासन पूजा, जोगवा, पोत ओवाळण, होमावर बलिदान आदी विधी पार पडतात. श्री तुळजाभवानी जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते म्हणून याठिकाणी घंटी नाही.
श्री तुळजाभवानी देवी जागृत आहे तशीच चल आहे. कारण तुळजाभवानी सिंहासनावरून तीन वेळा उठते व निद्रा करते. यात नवरात्रापूर्वी नऊ दिवस घोर निद्रा, नवरात्रानंतर पाच दिवस श्रमनिद्रा व शाकंभरी नवरात्रापूर्वी सात दिवस घोर निद्रा असे वर्षभरात एकूण २१ दिवस देवीची निद्रा असते. या निद्राकाळात देवीस दही, दुधाऐवजी सुगंधी तेलाचा अभिषेक घातला जातो.