उन्हाळ्याच्या झळा सोसवेना; पारा ३९ अंशांवर

By Admin | Updated: March 26, 2015 00:57 IST2015-03-26T00:50:02+5:302015-03-26T00:57:04+5:30

लातूर : उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. तापमानाचा पारा ३९ अंशांवर गेला असून, दुपारच्या वेळी अंगाची लाही-लाही सुरू झाली आहे

Sleep with summer light; Mercury at 39 degrees | उन्हाळ्याच्या झळा सोसवेना; पारा ३९ अंशांवर

उन्हाळ्याच्या झळा सोसवेना; पारा ३९ अंशांवर


लातूर : उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. तापमानाचा पारा ३९ अंशांवर गेला असून, दुपारच्या वेळी अंगाची लाही-लाही सुरू झाली आहे. या उकाड्यापासून सुटका करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रस्त्या-रस्त्यांवर शीतपेयांचे स्टॉल लागले असून, उकाड्याला दिलासा देणाऱ्या वस्तूही मोठ्या प्रमाणात बाजारात आल्या आहेत. कुलर, फॅन, एसी अशा वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या वस्तू दहा टक्क्यांनी महागल्या आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून बाजारात या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रेलचेल वाढली आहे.
लातूर शहरातील बाजारपेठेत कुलर १५०० ते १० हजारांपर्यंत, फॅन ५०० ते ४ हजारांपर्यंत, एसी २५ ते ३५ हजार रुपये, फ्रीज ७५०० ते २२ हजार रुपये आणि माठ ५० ते २०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सर्व वस्तूंच्या दरात यंदा सरासरी १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा ३९ अंशांवर गेला आहे. यामुळे दुपारच्या सुमारास उकाडा अधिकच जाणवत आहे. अंगाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते निर्मनुष्य होत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दुपारच्या सुमारास नागरिक सावलीचा सहारा घेण्यासाठी येत आहेत. तर सायंकाळी नाना-नानी पार्क, बुद्ध गार्डन येथे नागरिक येत आहेत. तर घरातील उकाडा दूर करण्यासाठी कुलर, एसी, फॅनच्या खरेदीलाही ग्राहक बाजारपेठेत येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ही विक्री सुरू आहे.
दरदिवसाला किमान तीन ते चार फॅन विक्रीला जात असल्याचे विक्रेते प्रताप भोसले यांनी सांगितले. एसीबाबत विचारणा होते. परंतु, घरगुती वापराऐवजी शासकीय कार्यालये, विविध आस्थापनांतून एसीला मागणी वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन व्यावसायिकांनी विविध कंपन्यांचे साहित्य विक्रीसाठी बाजारात आणले आहे. थंड पाणी, फळे, भाज्या ठेवण्यासाठी विविध कंपन्यांचे फ्रीजही आहेत़ वाढत्या उन्हापासून थोडासा दिलासा मिळावा, या दृष्टीकोनातून २५ ते ३५ हजारांपर्यंतच्या एसीही विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत़ वातावरणातील बदलामुळे आतापर्यंत नागरिकांना थंडावा देणाऱ्या साहित्याची खरेदी होत नव्हती़ परंतु गेल्या दोन दिवसांत उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे या साहित्याच्या खरेदीत वाढ झाली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Sleep with summer light; Mercury at 39 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.