जिल्ह्यात सहाव्या दिवशीही ‘दुष्टचक्र’ कायम

By Admin | Updated: March 15, 2015 00:36 IST2015-03-15T00:25:02+5:302015-03-15T00:36:45+5:30

जालना : जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशीही वादळी वारे, अवकाळी पावसासह काही भागात गारपिटीने पुन्हा तडाखा दिला

On the sixth day in the district, 'evil cycle' remained | जिल्ह्यात सहाव्या दिवशीही ‘दुष्टचक्र’ कायम

जिल्ह्यात सहाव्या दिवशीही ‘दुष्टचक्र’ कायम


जालना : जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशीही वादळी वारे, अवकाळी पावसासह काही भागात गारपिटीने पुन्हा तडाखा दिला. वातावरणातील बदलाने शेतीचे उरल्या-सुरल्या पिकांचेही नुकसान होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. भोकरदनसह जालना व परिसरात शनिवारी गारपीट झाली.
या जिल्ह्यात गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने खरीप व पाठोपाठ रबी पिकांचेही उत्पादन घटले. पाण्याअभावी टंचाईजन्य परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीचा सामना करत असताना गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाती येणारे उत्पन्नही निसर्गाने हिसकावले.
९ मार्चपासून जिल्ह्यात विविध भागात दररोज पाऊस सुरू आहे. शनिवारी रेवगाव परिसरात बोराएवढ्या आकाराच्या गारा पडल्या. त्यामुळे या परिसरातील शेतीचे नुकसान झाले. विशेषत: फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सर्वत्र पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सायंकाळी ५.३० पासून रात्री १० वाजेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांची मोठी फजिती होत असल्याचे चित्र शहरात दिसून आले.

भोकरदन : तालुक्यात १४ मार्च रोजी सांयकाळी ५ वाजेच्या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीटीने झोडपल्यामुळे शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे़
४ भोकरदन तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून निसर्ग कोपल्यामुळे कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी तर गेल्या दोन वर्षांपासून गारपीट सुरू झाली. शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षा पासुन तोडी आलेला घास निसर्गामुळे मातीमोल होत आहे़ तालुक्यात गेल्या तीन दिवसांपूर्वी दानापूर, वडशेद, तळणी, गोद्री, निंबोळा, मलकापूर, मनापूर या गावाच्या परिसरात अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, कांदा सिड, मका, आदी रब्बीची पीके हातची गेली. शनिवारी सांयकाळी परत या तालुक्यात अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे. तर हसनाबाद परिसरातील खंडाळा, गोषेगाव, कुंभारी, नवेभोकरदन, क्षीरसागर, नांजा, या भागात अवकाळी पावसासह बोराच्या आकाराच्या गारा पडल्यामुळे शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा या गारपीटीने झोडपले आहे़
४शासनाच्या वतीने ज्या गावात गारपिटीमुळे नुकसान झाले. त्या गावाना तहसीलदार अविशकुमार सोनोने, तालुका कृषी अधिकारी डी़बी़ व्यवहारे यांनी जाऊन पाहणी केली. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीपाची पिके आली नसल्याने दुष्काळी अनुदान जमा करण्याचे काम सुरू असतानाच रब्बी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे़ या पावसामुळे तालुक्यात गहु, हरभरा, कांदा, मका,आंबा, आदीचे मोठे नुकसान झाले आहे़ सध्या तालुक्यात पावसाळी वातावरण आहे.
जालना जिल्ह्यात एकूण ४३.३३ मि.मी. पाऊस गेल्या २४ तासात पडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात सर्वाधिक पाऊस भोकरदन तालुक्यात ५९.६१ मि.मी. झाला आहे. तसेच जालना तालुक्यात ५९.११ मि.मी. , जाफ्राबाद ५३.२० , बदनापूर २८.४०, परतूर ३७.२०, अंबड ४२.८३, घनसावंगी ४४.१२ तर मंठा तालुक्यात २०.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
४या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकरीवर्गाचे ऐन लग्नसराईतच दिवाळे निघाले आहे. या परिस्थितीत लेकीबाळीचे लग्नकार्य कसे पार पाडावे, असा यक्ष प्रश्न शेतकरीवर्गासमोर उभा राहिला आहे. मायबाप सरकारने गतवर्षीच्या दुष्काळी मदतीचे अद्याप सरसकट वाटप केलेले नाही. शिवाय ती मदतही अगदी नगण्य आहे. अशा स्थितीत निसर्गाचे हे तिहेरी संकट निर्माण झाले आहे.

Web Title: On the sixth day in the district, 'evil cycle' remained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.