सोळा लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार
By Admin | Updated: June 27, 2017 01:04 IST2017-06-27T01:00:57+5:302017-06-27T01:04:42+5:30
औरंगाबाद : देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर मराठवाड्यातील तीस लाख शेतकरी खातेदारांपैकी सोळा लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे,

सोळा लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार
स.सो. खंडाळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर मराठवाड्यातील तीस लाख शेतकरी खातेदारांपैकी सोळा लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे, यासाठी सात हजार कोटी रुपये लागणार आहेत. कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असला तरी त्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कायम राहणार आहे.
ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दीड लाखापेक्षा अधिक आहे, त्यांना उर्वरित कर्ज फेडण्यासाठी मुदत देण्याची गरज आहे, तसेच एकाच वेळी कर्ज भरता येणे शक्य नसल्यामुळे त्यांना कर्जाचे हप्ते बांधून दिले गेले पाहिजेत. ३० जून २०१६ पर्यंतच्या कर्ज थकबाकीदारांचा कर्जमाफी मिळणार आहे. जून २०१७ पर्यंतच्या थकबाकीदारांना कर्जमाफीची अपेक्षा होती.
मराठवाड्यात ३४ लाख ८२ हजार शेतकरी खातेदार असून, त्यापैकी २७ लाख ३५ हजार शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. सरकारने दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे मराठवाड्यातील ३० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल; पण त्यापैकी दीड लाखापर्यंत कर्ज असलेल्या सोळा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. त्यात १२ लाख शेतकरी एक लाखापर्यंत पीक कर्ज असलेले आहेत, तर चार लाख शेतकरी दीड लाखापर्यंत कर्ज असलेले आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांची दिली.
३० टक्केच परतफेड
या वाटप झालेल्या कर्जाची ३० टक्केच परतफेड झाली. उर्वरित कर्जाचे पुनर्गठन व जुन्याचे नवे करण्यात येऊन शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा कायम राहिला. दरवर्षी थकीत कर्जावर वाढणारे व्याज आणि चक्रवाढ व्याज यामुळे शेतकरी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर गेल्या चार वर्षांत विविध बँकांचे ३० हजार कोटींचे कर्ज थकले आहे.