सणासुदीत सहा हजार क्विंटल साखरेचा ‘गोडवा’
By Admin | Updated: August 13, 2014 00:59 IST2014-08-13T00:35:58+5:302014-08-13T00:59:46+5:30
दिनेश गुळवे, बीड सणासुदीच्या काळात एकीकडे महागाईचा भडका उडाला असला तरी दुसरीकडे मात्र स्वस्त धान्य दुकानांमधून लाभार्थ्यांना साखरेची वितरण करण्यात येत आहे.

सणासुदीत सहा हजार क्विंटल साखरेचा ‘गोडवा’
दिनेश गुळवे, बीड
सणासुदीच्या काळात एकीकडे महागाईचा भडका उडाला असला तरी दुसरीकडे मात्र स्वस्त धान्य दुकानांमधून लाभार्थ्यांना साखरेची वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध गोदामांमध्ये सहा हजार क्विंटल साखर आली असून आणखी साठ हजार क्विंटल साखर येणार आहे.
एक फेबु्रवारीपासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गहू, तांदूळ, भरडधान्य लाभार्थ्यांना योग्य किंमतीत मिळू लागले आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अडीच लाख शिधापत्रिकाधारकांना मिळत आहे. आतापर्यंत स्वस्त धान्य दुकानावर येणारी साखर ठरवून दिलेल्या डिलरकडून दुकानदारांना घ्यावी लागत असे. आता मात्र ही साखरही सरकारी धान्य गोदामातून वितरीत केली जाणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना येणाऱ्या विविध अडचणी सुटल्या जाणार आहेत.
गेल्या काही दिवसात खुल्या बाजारातील साखरेचे दर कमालीचे वाढले आहेत. साखर ३५ ते ३८ रुपये किलो दराने खुल्या बाजारात मिळत असल्याने सामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता स्वस्त धान्य दुकानात साखर आल्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांसह अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे.
सध्या श्रावण महिना असून यामध्ये विविध व्रतवैकल्य असतात. तसेच अगामी काळात पोळा, गौरीपूजन, गणपती, नवरात्र, दसरा व दिवाळी असे सण आहेत. अशा सणासुदीच्या काळात रेशन दुकानवर साखर येणार असल्याने शिधापत्रिकाधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.
सध्या जिल्ह्यासाठी ६ हजार ७४ क्विंटल साखल आली असून ती जिल्ह्यातील विविध शासकीय गोदामातून वितरीत केली जात असल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयातील वखरे यांनी दिली. तसेच अगामी काळात आणखी आठ हजार ३४ क्विंटल साखर येणार असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)