मारहाणप्रकरणी सहा जणांना अटक व सुटका
By Admin | Updated: September 11, 2014 01:08 IST2014-09-11T00:47:38+5:302014-09-11T01:08:13+5:30
लातूर : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत दोन मंडळांच्या पदाधिकाऱ्यात मिरवणूक पुढे घेण्याच्या कारणावरून सोमवारी रात्री तुंबळ हाणामारी झाली होती़

मारहाणप्रकरणी सहा जणांना अटक व सुटका
लातूर : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत दोन मंडळांच्या पदाधिकाऱ्यात मिरवणूक पुढे घेण्याच्या कारणावरून सोमवारी रात्री तुंबळ हाणामारी झाली होती़ या प्रकरणी गांधी चौक पोलिसांनी एका गटाच्या सहा जणांना बुधवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींची जामीनावर मुक्तता केली आहे.
लातूर शहरात सोमवारी रात्री श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात सुरू होत्या. गंजगोलाई येथे विसर्जन मिरवणूक आली असता अमर गणेश मंडळाच्या मिरवणुकीला बाजूला सारण्यासाठी अन्य एका गणेश मंडळाने गोंधळ घातला. कुरबुरीचे तुंबळ हाणामारीत रुपांतर झाले. यात एकजण जखमी झाला. प्रारंभी, पोलिसांनी बघ्याचीच भूमिका घेतली. मात्र परिस्थिती बिघडण्याची शक्यता लक्षात येताच पोलिस कुमक वाढवून मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, त्याचवेळी गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींची जामिनावर मुक्तता केली आहे.
अमोल अंधारे व राहूल अंधारे यांच्यासह त्यांच्या गणेशमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भांडणास सुरूवात केली़ अमर गणेश मंडळाची मिरवणूक थांबवून आमची मिरवणूक पुढे घेण्याचा आग्रह त्यांनी धरला होता. या प्रकरणी पोलिसांनी गांधी चौक पोलिसात फिर्याद देऊन अमोल अंधारे, राहुल अंधारे, प्रसाद बावगे, कृष्णा हाके, मनोज बागरेच्या, आनंद कैले या सहा जणांना गांधी चौक पोलीसांनी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास गांधी चौक पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
परंतु, न्यायालयात पुरावे सादर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली़ शिवाय, गांधी चौक पोलिसांकडून त्यांच्यावर १०७ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करून बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांना सोडून देण्यात आले़(प्रतिनिधी)