सहा अधिकाऱ्यांची होणार चौकशी
By Admin | Updated: November 6, 2016 00:56 IST2016-11-06T00:33:04+5:302016-11-06T00:56:35+5:30
औरंगाबाद : फाजलपुरा येथील टीडीआर घोटाळा प्रकरणात मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सहायक संचालक नगररचना अधिकारी डी. पी. कुलकर्णी यांच्यासह चार

सहा अधिकाऱ्यांची होणार चौकशी
औरंगाबाद : फाजलपुरा येथील टीडीआर घोटाळा प्रकरणात मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सहायक संचालक नगररचना अधिकारी डी. पी. कुलकर्णी यांच्यासह चार अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांचीही विभागीय चौकशी करण्यासाठी सर्वसाधारण सभेने मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव मनपा प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे. १९ नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभेत या विषयांवर चर्चा होणार आहे.
फाजलपुरा आणि आलमगीर कॉलनी येथे टीडीआर देताना मनपा अधिकाऱ्यांनी कायदे, नियम, अटी, शर्र्तींचे उल्लंघन केले होते. या प्रकरणात सहायक संचालक नगररचना डी. पी. कुलकर्णी यांच्यासह उपअभियंता शिरीष रामटेके, शाखा अभियंता राजेंद्र वाघमारे यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणात सहभाग असलेले निवृत्त उपअभियंता सय्यद फहिमोद्दीन, शाखा अभियंता मोहंमद वसील यांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.
फटाक्यांच्या १४० दुकानांना आग लागल्याप्रकरणी मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांना २९ आॅक्टोबर रोजी निलंबित करण्यात आले. त्यांचीही विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी दोषारोपपत्र तयार करण्याचे काम सुरू आहे. हर्सूल तलावातील गाळ काढण्याच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याने शहर अभियंता एस. डी. पानझडे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांचेही दोषारोपपत्र तयार करण्यात येत असल्याचे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांचीही विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तीन बिबटे डॉ. नाईकवाडे यांच्या हलगर्जीपणामुळे मरण पावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.