सहा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
By Admin | Updated: September 29, 2014 00:41 IST2014-09-29T00:41:35+5:302014-09-29T00:41:35+5:30
औरंगाबाद : विधानसभा निवडणूक आणि नवरात्राच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रविवारी पहाटे जिन्सी परिसरात कोम्बिंग आॅपरेशन राबविले.

सहा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
औरंगाबाद : विधानसभा निवडणूक आणि नवरात्राच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रविवारी पहाटे जिन्सी परिसरात कोम्बिंग आॅपरेशन राबविले. यामध्ये ६८ गुन्हेगारांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी ६ खतरनाक गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांच्या निर्देशानुसार जिन्सी ठाण्याचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी पहाटे ४.३० वाजताच बायजीपुरा, संजयनगर, रहेमानिया कॉलनी, बाबर कॉलनी, कैसर कॉलनी आणि रोशनगेट भागात कोम्बिंग आॅपरेशनला सुरुवात झाली. यासाठी जिन्सी पोलिसांच्या मदतीला पोलीस मुख्यालय, सिडको ठाणे व क्रांतीचौक ठाण्याचे १० अधिकारी व ७० कर्मचाऱ्यांचा ताफा होता. या सहा वसाहतींसाठी पोलिसांची प्रत्येकी एक याप्रमाणे सहा पथके तैनात करण्यात आली.
या पथकाने भल्या पहाटे प्रत्येकी १० घरांची झडती सुरू केली.
पोलिसांनी सुरू केलेल्या या धाडसत्रामध्ये २ तडीपार गुन्हेगार व पोलिसांना हव्या असलेल्या रेकॉर्डवरील ४ खतरनाक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या सर्व गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांची हर्सूल मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांना धडकी भरली असून, आयुक्तांच्या आदेशानुसार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशा प्रकारचे कोम्बिंग आॅपरेशन राबविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्व चौक व मुख्य रस्त्यांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला आहे. कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य निवडणुकीमध्ये होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहेत.