सहा जनावरे दगावली
By Admin | Updated: March 1, 2016 00:39 IST2016-03-01T00:19:17+5:302016-03-01T00:39:40+5:30
उस्मानाबाद : एकीकडे भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांना रविवारी रात्री झालेल्या अवकाळीचा तडाखा सहन करावा लागला़ गारपिट,

सहा जनावरे दगावली
उस्मानाबाद : एकीकडे भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांना रविवारी रात्री झालेल्या अवकाळीचा तडाखा सहन करावा लागला़ गारपिट, वादळी वाऱ्यामुळे ज्वारीसह फळबागांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे़ तर तीन ठिकाणी वीज पडल्याने सहा जनावरे ठार झाली आहेत़ विशेषत: ज्वारीचा कडबा भिजल्याने उपलब्ध होणाऱ्या चाऱ्याचेही मोठे नुकसान झाले असून, पशुपालक अणखी अडचणीत सापडले आहेत़ दरम्यान, रविवारी रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात सरासरी ८़७० मिमी़ पाऊस झाल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे़
मागील वर्षी खरिप पेरणीच्या वेळी पाऊस न पडल्याने ५० टक्क्याहून कमी प्रमाणात पेरणी झाली होती़ त्यानंतरच्या पावसावर काहींनी पेरणी केली़ मात्र, पुन्हा पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला होता़ सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसाच्या जीवावर शेतकऱ्यांनी रबीची पेरणी केली होती़ मात्र, अपुऱ्या ओलीमुळे रबी हंगामही शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे़ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाचा सामना करीत उपलब्ध पाण्यावर ज्वारी, हरभऱ्यासह फळबागांची जोपासना केली आहे़ मात्र, रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली़ बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने ज्वारीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले़ तर अनेक गावातील घरावरील, शाळांवरील पत्रेही उडून गेल्याने संबंधितांना नुकसानीचा फटका सहन करावा लागला़
वादळी वाऱ्यासह झालेल्या या अवकाळी पावसात जिल्ह्यात तीन ठिकाणी विजा कोसळल्या़ यात उमरगा शिवारात वीज पडल्याने प्रेमनाथ पांडूरंग सुरवसे यांच्या २ गाई आणि १ वासरू, उमरगा तालुक्यातील कसगी शिवारात वीज पडल्याने गणपती रत्नाजी सुरवसे यांचा १ बैल, तसेच जवळगा बेट येथील माधव दशरथ बिराजदार यांचे २ बैल अशी एकूण ५ मोठी व १ लहान जनावरे वीज पडल्याने मयत झाली़ यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे़ (प्रतिनिधी)