रस्त्यांच्या दुरवस्थेने ग्रामस्थांचे हाल
By Admin | Updated: July 23, 2014 00:30 IST2014-07-22T22:57:44+5:302014-07-23T00:30:38+5:30
गेवराई : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

रस्त्यांच्या दुरवस्थेने ग्रामस्थांचे हाल
गेवराई : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ते खड्डेमय झाल्याने शेतकऱ्यांनाही अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार रस्ते दुरुस्तीची मागणी करू नही रस्ते दुरस्ती होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील पोखरी ते साक्षाळपिंप्री या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. पोखरीसह टाकळगव्हाण, खडकी, उक्कडपिंप्री, धारवंटा आदी ठिकाणच्या ग्रामस्थांना या रस्त्यावरून मादळमोहीसह गेवराई येथे जाण्यासाठी प्रवास करावा लागतो. रस्त्यांवरील खड्ड्यामुळे अनेकदा रात्री-अपरात्री वाहने नादुरुस्तही होत आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल तर होतातच; शिवाय वाहनचालकांना नाहक खर्चही सहन करावा लागत आहे. तसेच यामार्गावरून नारायणगड येथे भाविक वाहनांसह पायी दिंंडीनेही जातात. या भाविकांनाही रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी सुनील धस, देवराव जोगदंड, बाळू जोगदंड आदींनी केली आहे.
तालुक्यातील उमापूर रस्त्याची गेल्या सहा महिन्यापासून दुरुस्ती सुरू आहे. यासाठी खडी आणलेली आहे. मात्र, काम अत्यंत संथ गतीने होत असल्याने प्रवाशांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे. हा १८ कि.मी. चा रस्ता आहे. रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने अनेक ठिकाणी खडी उघडी पडली आहे.
रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावरच खडी टाकलेली आहे. त्यामुळे ही खडीही इतर रहदारीस अडथळा ठरत आहे. या खडीमुळे अनेकदा दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटनाही येथे झालेल्या आहेत. यामुळे या रस्त्याची दुरुस्ती गतीने करावी, अशी वारंवार मागणी केली जात आहे. मात्र सदरील काम गतीने करण्यात येत नसल्याने प्रवाशांचे हाल कायमच आहेत.
तालुक्यातील रेवकी-देवकी या रस्त्याचीही चाळणी झाली आहे. तलवाडा रोेड ते अंतर्गत रस्ता खराब झाल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. या रस्त्यावरून शेतकरी दररोज शेतात जातात तसेच आपला शेतीमाल, भाजीपाला विक्रीसाठी आणतात. खराब रस्त्यामुळे बैलगाडी कशी हाकावी असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडत आहे.
मन्यारवाडी, राहेरी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून वारंवार होत आहे. मात्र, सदरील कामास अद्यापही मुहूर्त मिळाला नसल्याने ग्रामस्थांचे हाल कायम आहेत. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी किसन काशीद, देविदास भोसले, भाऊसाहेब माखले आदींनी केली आहे. तालुक्यातील रस्त्यांबाबत उपअभियंता आर. एन. वाघमारे म्हणाले, दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. मंजूर झाल्यानंतर रस्ते दुरुस्ती करू. (वार्ताहर)