निलंगा तालुक्याला अवकाळीने झोडपले
By Admin | Updated: April 10, 2015 00:29 IST2015-04-10T00:16:06+5:302015-04-10T00:29:04+5:30
निलंगा शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. तसेच दोन ठिकाणी विजा कोसळल्या. गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मोठा पाऊस झाला.

निलंगा तालुक्याला अवकाळीने झोडपले
निलंगा शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. तसेच दोन ठिकाणी विजा कोसळल्या. गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मोठा पाऊस झाला. काही क्षणातच शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. गटारी तुंबल्याने रस्त्यावरून पाणी वाहत होते.
४लांबोटकर पेट्रोलपंपाच्या मागे एका झाडाखाली थांबलेल्या बैलावर वीज पडल्याने बैल ठार झाल्याचे पशुपालक उस्मान शेख यांनी सांगितले. शिवणी येथे शेतात काम करीत असताना दत्तू कोरे (वय ५५) यांचा वीज पडून मृत्यू झाला.
निलंगा तालुक्यातील हाडगा येथे भागवत क्षीरसागर यांच्या गायीवर वीज पडल्याने गायीचा मृत्यू झाला. गुरुवारच्या पावसात तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन पंचनामा केला. निलंगा परिसरात असलेल्या प्रा. अभिमन्यू पाखरसांगवे यांच्या अडीच एकर आंब्याच्या झाडांचा आंबा गळून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय, सुरेश श्रीमंत माने यांच्या शेतात म्हशीच्या अंगावर वीज कोसळल्याने म्हैस दगावली.
मुगाव परिसरात जीवन सोपान कोळेकर यांचा बैल व उमेश बंडू धुमाळ यांची म्हैस वीज पडल्याने दगावली आहे. निलंगा परिसरात अयुब बागवान यांच्या तीन एकर केळीची बाग पावसाने उद्ध्वस्त झाल्याने जवळपास सात लाखांचे नुकसान झाले आहे. शिवाय, निलंगा शहराच्या विविध भागांत पावसाचे पाणी रस्त्याने वाहत होते.
लातूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह लातूर, औसा, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, चाकूर, जळकोट, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ आदी ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. किनगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. तर जळकोट तालुक्यातील मंगरुळ येथील १० ते १५ घरांवरील पत्रे उडाली. तसेच गुरुवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानीत भर पडली आहे. लातूर तालुक्यात २.१३ मि.मी., औसा-०.१४, रेणापूर-०.७५, उदगीर-१८.४३, अहमदपूर-२.६७, चाकूर- ५.८०, जळकोट-७.००, निलंगा-१.८८, देवणी-२०.६७, शिरूर अनंतपाळ-१३.३३ एकूण ७.२८ मि.मी. जिल्ह्यात पाऊस झाला.