साहेब.... मी तीन दिवसांपासून रांगेत तेव्हा डोस मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:02 IST2021-05-07T04:02:21+5:302021-05-07T04:02:21+5:30
-साहेबराव हिवराळे- औरंगाबाद : कोरोनापासून संरक्षण कवच असलेली प्रतिबंधक लस घेण्यासाठी एन ११ हडको येथे गर्दी होत असल्यामुळे ...

साहेब.... मी तीन दिवसांपासून रांगेत तेव्हा डोस मिळाला
-साहेबराव हिवराळे-
औरंगाबाद : कोरोनापासून संरक्षण कवच असलेली प्रतिबंधक लस घेण्यासाठी एन ११ हडको येथे गर्दी होत असल्यामुळे टोकण देऊन दुसरा डोस दिला जात आहे. रांगेत असलेल्या आजीबाई म्हणाल्या की, साहेब.... मी तीन दिवसांपासून रांगेत येतेय तेव्हा डोस मिळाला.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणास शहरात मनपाचे सुरुवात केली आहे. गुरुवारी केंद्रावर ३०० डोस सकाळी आले होते. त्यांचे योग्य नियोजन व्हावे म्हणून टोकण पद्धतीने आधार कार्ड नोंदणी करून गर्दी टाळण्यासाठी वेळ सांगितली जात होती. त्यानुसार कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या.
टोकण आणि लस घेण्यासाठी रांग...
खाली पोट लस घेऊ नका. काहीतरी नाष्टा करून आलात का? असे डॉक्टर, नर्स तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना विचारत होते. सकाळपासून रांगेत उभे राहिल्यानंतर टोकण मिळाले, तर लस घेण्यासाठी सुद्धा रांगेतच आहोत अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत होती.
नागरिकांच्या प्रतिक्रिया...
रांगेतून लसविना जावे लागते..
लस घेण्यासाठी दुसऱ्यांदा उन्हात आले. मात्र, परत जावे लागले. याविषयी नियोजन चांगले असावे. वयोवृध्दांना त्रास होतो.
- मुक्ताबाई कांबळे
टोकणनुसार बोलवतील...
ज्येष्ठ नागरिक पती-पत्नी टोकण घेऊन रांगेत आहोत. सकाळपासून रांग पार करीत आहोत. आतमध्ये बोलवतील, या प्रतीक्षेत आहोत.
-रमेश पटवर्धन, पुष्पलता पटवर्धन
गर्दीची भीती वाटते....
लस घेण्यासाठी टोकण दिले असले तरी रांगा आहेत. यात कोणी बाधित असल्यास आपण कसे ओळखायचे, गर्दीची भीती वाटते. त्यामुळे तोंडाला मास्क बांधून दुसरा डोस घेण्यासाठी थांबले. -सुशीला कुलकर्णी
लस सुरक्षित म्हणून सेल्फी...
कोरोना प्रतिबंधक लस लढा देण्यासाठी चांगली असल्याने दुसरा कोविशिल्डचा डोस घेतला. त्यामुळे इतरांनीही लस घेण्यासाठी सेल्फी काढली.
-राजेंद्र कोलते
जानेवारी ते मे साडेचौदा हजार लस...
एन ११ येथील आरोग्य केंद्रावर लसीकरणाची सुरुवात करण्यात आली तेव्हापासून येथे सातत्याने लसीकरण सुरू आहे. पहिला आणि दुसरा डोस असे एकूण १४५०० नागरिकांना देण्यात आली आहे. नागरिकांत जनजागृती होत असून लस कमी पडते आहे. तिचा अधिक पुरवठा होणे गरजेचे आहे. केंद्रावरून कुणीही परत जाऊ नये हाच आमचा प्रयत्न आहे. हे करीत असताना त्रिसूत्रीचा वापर करणे खूप गरजेचे आहे.
-डॉ. रवी सावरे, (आरोग्य अधिकारी, एन ११ मनपा आरोग्य केंद्र)