एकटी महिला कसतेय ४२ एकर शेती
By Admin | Updated: February 23, 2016 00:42 IST2016-02-23T00:39:14+5:302016-02-23T00:42:20+5:30
उमरगा : अपुरा पाऊस, चाऱ्याचा प्रश्न अशा एक ना अनेक समस्यांचा सामना शेतकरी, पशुपालकांना करावा लागत असून, अनेकांनी नैराश्येतून आत्महत्या केल्या आहेत़

एकटी महिला कसतेय ४२ एकर शेती
उमरगा : अपुरा पाऊस, चाऱ्याचा प्रश्न अशा एक ना अनेक समस्यांचा सामना शेतकरी, पशुपालकांना करावा लागत असून, अनेकांनी नैराश्येतून आत्महत्या केल्या आहेत़ मात्र, उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील ५० वर्षीय महिला एक दोन नव्हे तब्बल ४२ एकर जमीन स्वत: कसत आहे़ पारंपरिक पद्धतीने शेती कसून या महिलेने दुष्काळातही चांगले उत्पन्न घेतले आहे़
उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील शोभा रामकृष्ण गायकवाड (वय-५०) ही महिला स्वत: ४२ एकर शेती कसत आहे़ त्यांचे माहेर हे तालुक्यातील बलसूर हे गाव आहे़ वयाच्या १० व्या वर्षांपासूनच त्यांनी वडील तुळशीराम बिराजदार यांच्यासोबत शेती कसण्यास सुरूवात केली़ वयाच्या २० व्या वर्षी त्यांचा विवाह गुंजोटी येथील रामकृष्ण गायकवाड यांच्याशी झाला़ रामकृष्ण गायकवाड हे सतत आजारी राहत असल्याने त्यांनी त्यांच्याकडील २२ एकर शेती स्वत: कसण्याचा निर्णय घेतला़ लग्नानंतर अवघ्या चार महिन्यानंतर घरच्या शेतीची संपूर्ण सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. नांगरणे, कुळवणे, बैलगाडी जुंपणे, बैलगाडी हाकणे, काढणी, मोडणी, रास, खुरपणी, शेतीतील सर्व अंतर्गत मशागतीची कामे त्या स्वत: करू लागल्या़ सध्या त्यांच्याकडे तीन बैलजोड्या असून, गायी, म्हशी, वासरे अशी एकूण २० जनावरे आहेत़ त्यांनी गावातीलच शहा यांची २० एकर जमीनही कसण्यासाठी घेतली आहे़ स्वत:ची २२ एकर आणि शहा यांची २० एकर अशी तब्बल ४२ एकर जमीन एकट्या शोभा गायकवाड कसत आहेत़ शेताचे क्षेत्र मोठे असल्याने त्यांनी आधुनिक शेतीऐवजी पारंपरिक शेतीवर भर दिला़ वेळेवर मशागत करणे, उपलब्ध जनावरांचे शेणखत शेतात वापरणे, वेळेवर नांगरणी, उन्हाळी पाळ्या करणे, वेळेवर पेरणी करून जमिनीच्या गुणवत्तेप्रमाणे पिके घेण्यास सुरूवात केली आहे़ आधुनिक शेतीसाठी लागणारी अवजारे, किटक नाशके, महागडी खते, बी-बियाणे यापेक्षा कोरडवाहू शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्या सांगतात. गावाच्याच नव्हे तर तालुक्याच्या शिवारात यंदा कमी पाऊस झाला़ त्यांच्या शेतातील पाच पैकी चार कूपनलिका बंद पडल्या आहेत़ मात्र, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून त्यांनी खरीप, रबी हंगामात तूर, सोयाबीन, सूर्यफूल, बाजरी, ज्वारी आदी पिकांचे भरघोस उत्पादन घेतले आहे़