‘सिंघम’स्टाईलवर झाली होती पब्लिक फिदा !

By Admin | Updated: May 21, 2015 00:30 IST2015-05-21T00:08:19+5:302015-05-21T00:30:30+5:30

संजय तिपाले / सखाराम शिंदे , गेवराई ज्येष्ठ नेते माजी आ. माधवराव पवार यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकांत जाहीर सभांमधून पंडितांविरुद्ध रान पेटवले होते

'Singham' was on the public! | ‘सिंघम’स्टाईलवर झाली होती पब्लिक फिदा !

‘सिंघम’स्टाईलवर झाली होती पब्लिक फिदा !


संजय तिपाले / सखाराम शिंदे
, गेवराई
ज्येष्ठ नेते माजी आ. माधवराव पवार यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकांत जाहीर सभांमधून पंडितांविरुद्ध रान पेटवले होते. दोन पंडित एकत्र आल्याने निर्माण झालेली रिअ‍ॅक्शन ‘कॅश’ करतानाच त्यांनी वयाच्या पासष्टीमध्येही तरुण नेत्यांना लाजवेल अशी तडाखेबंद भाषणे केली होती. त्यामुळेच स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी माधवराव पवारांचा उल्लेख ‘सिंघम’ असा केला होता. या आणि अशा कित्येक आठवणी गेवराईकरांनी बुधवारी ताज्या केल्या.
राजकारणात स्वकीयांशी झुंज देत यश-अपयश पचविण्याची क्षमता ठेवणारे फार कमी नेते असतात. माधवराव पवार त्यापैकीच एक़ ते यशाने कधी हुरळून गेले नाही की अपयशाने डगमगून! एका बाजूला नात्याचे रेशीम बंध अन् दुसऱ्या बाजूला सोयऱ्यांसोबत राजकीय वैर... अशा दुहेरी भूमिकेतून ते जगले.
५ जुलै १९५० रोजी माधवरावांचा जन्म झाला. बी.ए. ची पदवी घेतल्यानंतर ते राजकारणाशी जोडले गेले. १९७२ मध्ये जि.प. सदस्य म्हणून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांना आस्मान दाखवत त्यांनी १९८० मध्ये आमदार होण्याचा मान मिळवला. त्यानंतरच्या निवडणुकीत शिवाजीराव पंडितांनी ‘हिसाब बराबर’ करत पवारांच्या विधानसभावारीला ‘ब्रेक’ लावला होता. पुढे शिवाजीराव पंडित यांचे चिरंजीव जयसिंह व माधवराव पवार यांची कन्या वृषाली यांचा विवाह झाला. त्यामुळे काही काळ त्यांच्यातील राजकीय वैर मावळले होते. पंडितांनी तालुक्यात तर पवारांनी शहरात सत्ता गाजवली. मात्र, नंतर त्यांच्यात पुन्हा सत्तासंघर्षाची ठिणगी पडली. दोन वर्षांपूर्वी गेवराईत माधवराव पवार, अ‍ॅड. लक्ष्मण पवार या पिता- पुत्रांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीवेळी स्व. मुंडे यांच्या प्रचाराचा नारळ गेवराईत फोडला होता. या सभेत माजी आ. माधवराव पवार यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत मुंडे यांना गेवराईतून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा शब्द दिला होता. हा शब्द त्यांनी खरा करुन दाखवला होता.
राष्ट्रवादीने केलेल्या टिकेला उत्तर देताना पवार यांनी ‘तुम्ही पिक्चरची भाषा काय करता? माझा धंदाच पिक्चर दाखविण्याचा आहे, १७ एप्रिलला मी तुम्हालाच पिक्चर दाखवतो’ असे ठणकावले होते. दोन पंडितांमधील एकीवर ‘मेरे फोटो को सीने से आज चिपकाले सैंय्या फेविकॉल से’ या गाण्यातून त्यांनी बोट ठेवले होते. या गाण्यानंतर पब्लिकमधून जोरदार शिट्ट्या, टाळ्या वाजवून प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे सभेचा नूरच पालटला होता. पवारांनी केलेल्या भाषणाला स्व. मुंडे यांनीही दाद दिली होती.
माधवराव पवार यांना १९८० मध्ये आमदार होण्याची संधी मिळाली होती. दुसऱ्या टर्मला त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांनी शहरावर ‘होल्ड’ राखला;परंतु तालुक्यात दोन्ही पंडितांचीच चलती होती. विधानसभा निवडणुकीत माधवराव पवार यांचे पुत्र अ‍ॅड. लक्ष्मणराव यांनी मोठ्या मताधिक्क्यासह विजय नोंदवला. दोन्ही पंडितांविरुद्ध एकाकी लढा देत पवारांनी ३५ वर्षांनंतर तालुक्याची सत्ता पुन्हा काबिज केली. पुत्र लक्ष्मणराव यांच्या विजयात माधवराव पवार यांचा मोठा वाटा होता.

Web Title: 'Singham' was on the public!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.