सुगम संगीताचे शिक्षण देणाऱ्या संस्थेची औरंगाबाद शहरात गरज...
By Admin | Updated: August 10, 2014 02:10 IST2014-08-10T02:10:27+5:302014-08-10T02:10:57+5:30
नजीर शेख औरंगाबाद सुगम संगीताच्या चाहत्यांसाठी शास्त्रशुद्ध शिक्षण देणाऱ्या संस्थेची आपल्या शहरात नक्कीच गरज आहे, असे मत संगीततज्ज्ञ विश्वनाथ ओक यांनी मांडले.

सुगम संगीताचे शिक्षण देणाऱ्या संस्थेची औरंगाबाद शहरात गरज...
नजीर शेख औरंगाबाद
जास्तीत जास्त लोकांना भावणाऱ्या सुगम संगीताच्या चाहत्यांसाठी या प्रकारचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणाऱ्या संस्थेची आपल्या शहरात नक्कीच गरज आहे, असे मत संगीततज्ज्ञ विश्वनाथ ओक यांनी मांडले. अशी संस्था झाल्यास विशेषकरून चित्रपट संगीताचे कार्यक्रम किंवा आकाशवाणी - दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगली यंत्रणा निर्माण होऊ शकेल, असे विश्वनाथ ओक यांना वाटते.
‘माझ्या शहरात काय हवे’ यासंदर्भात संगीत क्षेत्रातील जाणकार असलेल्या ओक यांनी शहरातील संगीतविषयक उपक्रम आणि संगीतकलेचा विस्तार याचा आढावाही घेतला. भारतीय संगीतात रागदारी शास्त्रीय संगीताला खूप महत्त्व आहे. त्याच्या अभ्यासासाठी विविध महाविद्यालये, विद्यालये, शिक्षणसंस्था यांच्याकडे तसे शिक्षण देण्याची सोय आहे. मात्र, तुलनेने पाहिले तर शास्त्रीय संगीतापेक्षा सुगम संगीत आवडणाऱ्यांची आणि जमेल तसे गाऊ इच्छिणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. याचे एक कारण म्हणजे शास्त्रीय संगीत शिकणे हा दीर्घकालीन भाग आहे. तुलनेने सुगम संगीत हे तितके जटील नाही. मात्र, त्यासाठीसुद्धा पद्धतशीर आणि शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी यंत्रणा हवीच. सुगम संगीत या संकल्पनेत चित्रपट संगीत, गैरचित्रपट संगीत, नाट्य संगीत यांचा प्रामुख्याने समावेश होतो. या प्रत्येक प्रकारच्या संगीताच्या शिक्षणाचेदेखील शास्त्र आहे; पण हे शास्त्र प्रथम स्वत: समजून घेणारे आणि त्यानंतर इतरांना तेवढ्याच ताकदीने शिकवू शकणारे सुसांगीतिक घटक या शहरात अभावानेच आढळतात. त्यामुळे मला असे वाटते की, जास्तीत जास्त संख्येने असणाऱ्या सुगम संगीताच्या चाहत्यांसाठी संस्थांची गरज आहे.
माझ्या स्वत:कडे सत्तरहून जास्त विद्यार्थी असे सुगम संगीताचे शिक्षण घेतात आणि त्यातून कित्येक जण आता प्रभावीपणे आपले गायन सादर करीत आहेत. मात्र, याचा विस्तार होणे गरजेचे आहे. सुगम संगीतासाठी संस्था किंवा यंत्रणा निर्माण करताना तिची कार्यपद्धती, शैक्षणिक सत्रांची निर्मिती, परिपूर्ण अभ्यासक्रम याचा मूलभूत विचार करायला हवा. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत यातील समान धागे कोणते आहेत आणि कशाचा अभ्यास कसा करायचा, हे सांगितले गेले पाहिजे. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यावर कुठे संधी मिळू शकते याचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना मिळायला हवे. वरवर हलकेफुलके वाटणारे चित्रपटसंगीत उत्तम रीतीने सादर करण्यासाठीसुद्धा नेमके काय करायला पाहिजे, हे विद्यार्थ्यांना समजून दिले पाहिजे. त्यांच्याकडून ते तसे करून घेतले पाहिजे. अशा प्रकारच्या संस्थात्मक कामाचा शहरातील उदयोन्मुख कलावंतांना मोठा लाभ होईल. अशा कामासाठी शहरात कुशल संघटकांची आवश्यकता आहे. शिवाय सामूहिक स्तरावर याबाबत विचार करण्याची गरज आहे. त्यातून या शहरातील सांगीतिक घडामोडींना वेग येण्याची अपेक्षा आहे.
राजाश्रयही हवा
आपल्या शहरात सध्या विविध कलावंत आपापल्या परीने सुगम संगीताचे खूप कार्यक्रम घेत आहेत. अनेक जण शिकण्यासाठी इच्छुक असतात. अनेक जण यामध्ये आपले करिअरही करू इच्छितात. संगीत ही साधना आहे हे खरे असले तरी कलावंताचे पोटही महत्त्वाचे असते. तळमळीने काम करणाऱ्या संस्थांना राजाश्रयही हवा असतो. देशाचे उपपंतप्रधान व राज्याचे नेते यशवंतराव चव्हाण यांच्याकडे कलावंतांना राजाश्रय देण्याचा दृष्टिकोन होता.