वाळू माफियांना फौजदारीचा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2017 23:39 IST2017-04-17T23:38:39+5:302017-04-17T23:39:14+5:30

अंबड : वाळूमाफियांविरोधात उघडलेली मोहीम सोमवारी अधिक तीव्र करण्यात आली.

The silver mafia offers criminal charges | वाळू माफियांना फौजदारीचा प्रसाद

वाळू माफियांना फौजदारीचा प्रसाद

अंबड : वाळूमाफियांविरोधात उघडलेली मोहीम सोमवारी अधिक तीव्र करण्यात आली. शनिवारी पहाटे अवैध वाळू वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या चार ट्रकपैकी दोन ट्रकला ३ लाख ४ हजार रुपयांचा जबरी दंड ठोठावण्याचे व दोन हायवा ट्रकवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी सोमवारी दिले.
विशेष म्हणजे महसूल विभागातील काही भ्रष्ट व कामचुकार अधिकारी- कर्मचाऱ्यांचा असहकार, लोकप्रतिनिधी व तथाकथित समाजसेवक यांचा वाळू माफियांच्या कारवाईविरोधात प्रचंड दबाव, काही भ्रष्ट पोलीस अधिकारी-कर्मचारी यांचे वाळूमाफियांसोबत असलेले संगनमत अशा सर्व परिस्थितीत तहसीलदारांच्या वाळू माफिया विरोधातील एकाकी लढाईला कितपत यश येते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
शुक्रवारी रात्री व शनिवारी पहाटे तहसीलदार भारस्कर यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे चार ट्रक पकडले. हे चारही ट्रक पोलीस ठाणे आवारात लावण्यात आले. धक्कादायक म्हणजे ट्रक लावत असताना चार पैकी दोन मुजोर वाहन चालक ठाण्यातून महसूल पथकादेखत फरार झाले. सोमवारी (एम.एच.४६-एफ-५८७१) व (एम.एच.२०-डी.ई.-९८८२) या दोन हायवा ट्रक यांना प्रत्येकी १ लाख ५२ हजार रुपयांप्रमाणे एकूण ३ लाख ४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचे तसेच (एम. एच. २०-ई.जी.-५७९९) व (एम.एच.२०-डी. ई.-३२०४) या दोन ट्रक विरोधात अंबड पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार नोंदविण्याचे आदेश तहसीलदार भारस्कर यांनी सोमवारी जारी केले.
मागील एक महिन्यापासून भारस्कर यांनी वाळूमाफियांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडल्यापासून दोन कोतवालांना मारहाण करणे, तहसीलदारांच्या वाहन चालकाला जबर मारहाण करुन चालत्या वाहनासमोर फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व शनिवारी वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकचे मालक ाच्या बहिणीने तीन तलाठ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे अशा विविध घटना घडल्या आहेत. अंबड व घनसावंगी तालुक्यात वाळू माफियांची समांतर व्यवस्था कार्यरत आहे. यामध्ये काही भ्रष्ट महसूल अधिकारी-कर्मचारी, काही भ्रष्ट पोलीस अधिकारी-कर्मचारी, काही विविध राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्ते, विविध पदांवर असलेले काही लोकप्रतिनिधींपासून रात्रभर वाहनांद्वारे तहसीलदारांवर पाळत ठेवण्याचे काम करणाऱ्या बेरोजगार युवकांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. या संपूर्ण व्यवस्थेने वाळू माफियांविरोधात सुरु असलेली मोहीम बंद करण्यासाठी प्रचंड दबाव निर्माण केला आहे. एकूणच वाळूमाफियांच्या दहशतीने अंबड व घनसावंगी तालुक्यातील महसूल विभागही हातबल आहे.

Web Title: The silver mafia offers criminal charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.