करमाड पोलिसांनी बांधली प्रेमीयुगुलाची रेशीमगाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:04 IST2021-04-10T04:04:06+5:302021-04-10T04:04:06+5:30
करमाड पोलिसांत ६ एप्रिल रोजी मुलीची मिसिंग दाखल करण्यात आली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी मुलीचा शोध ...

करमाड पोलिसांनी बांधली प्रेमीयुगुलाची रेशीमगाठ
करमाड पोलिसांत ६ एप्रिल रोजी मुलीची मिसिंग दाखल करण्यात आली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी मुलीचा शोध सुरू केला. तेव्हा, तिचे पळशी येथील रमेश (नाव बदलले आहे ) याच्यावर प्रेम असून, दोघेही लग्न करण्याच्या उद्देशाने पळून गेले आहेत असे कळले. याबाबत तात्काळ मुलाच्या भाऊजीशी संपर्क करून त्यांनी मुलीबाबत सखोल चौकशी केली. तेव्हा त्यांनी राजश्री रमेशसोबत असल्याचे मान्य केले. सुरुवातीला विरोध करणाऱ्या पालकांचे पोलिसांनी समुपदेशन केल्यानंतर, त्यांनी विवाहाला मान्यता दिली.
त्यानुसार पळशी येथील मुलाच्या भाऊजीच्या घरी पोलिसांच्या मध्यस्थीने बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास साधेपणाने मुलीच्या आई- वडिलांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करून त्यांचा विवाह लावण्यात आला. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस अंमलदार आनंद घाटेश्वर यांचे कौतुक करून त्यांना बक्षीसही जाहीर केले आहे.
--------------------------------------------------------
फोटो ओळ
करमाड पोलिसांनी समुदेशन केल्यानंतर प्रेमीयुगुलाचा विवाह साध्या पध्दतीने पार पडला.