रेशीम क्लस्टर वर्षअखेरीस कार्यान्वित होणार...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 00:22 IST2017-03-04T00:20:31+5:302017-03-04T00:22:25+5:30
जालना : जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळावी अद्ययावत प्रशिक्षण व माहिती मिळावी म्हणून जालना शहरानजीक रेशीम मार्केट उभारणीस शासनाने मान्यता दिली आहे

रेशीम क्लस्टर वर्षअखेरीस कार्यान्वित होणार...!
जालना : जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळावी अद्ययावत प्रशिक्षण व माहिती मिळावी म्हणून जालना शहरानजीक रेशीम मार्केट उभारणीस शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी ५ कोटी ८२ लाखांचा निधीही मंजूर झाला असून, वर्ष अखेरीस हे क्लस्टर सुरू होईल, असा विश्वास रेशीम विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी रेशीम मार्केटच्या प्रस्तावाचा आढावा घेऊन कोणत्या योजनेतून निधी उपलब्ध करता येईल, याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेतला.
शहराजवळील सिरसवाडी शिवारात रेशीम मार्केट होत आहे.चार आॅक्टोबर २०१६ रोजी औरंगाबाद येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मार्केटला मान्यता देण्यात आली होती. या मार्केटसाठी सहकार व वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५ कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. तुती उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना ज्या काही सुविधा पाहिजे त्या या ठिकाणी पुरविण्यात येणार आहेत. येथे तांत्रिक तसेच कुशल मनुष्यबळ येथे असणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष विक्रीसाठी जालना हे मध्यवर्ती ठिकाण आहे. शेतकऱ्यांना व रिलिंग उद्योजकांना कोष खरेदी विक्रीसाठी सोयीस्कर आहे. येथील एकाच मार्केटमध्ये कोष व सूत खरेदी विक्री करण्याची सुविधा असणार आहे. मार्केट निर्मितीमुळे रेशीम लागवड क्षेत्रातही वाढ होण्याचा अंदाज रेशीम अधिकारी व्यक्त करतात.
कर्नाटक येथे असलेल्या बाजारपेठेच्या धर्तीवरच ही बाजारपेठ होणार आहे.
शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत रेशीम शेतीवर भर दिला आहे. कमी दिवसांत व नगदी पीक म्हणून जिल्ह्यात तुती लागवड वाढली आहे. कर्नाटकऐवजी स्थानिक बाजारपेठ महत्वाची भूमिका बजावणार आहे. बाजारपेठेचा जालना सोबतच तब्बल दहा हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ३ हजार ९०० एकर तुतीचे क्षेत्र आहे. यात ३ हजार ४०० शेतकऱ्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळत असल्याचे रेशीम अधिकाऱ्यांनी सांगितले.