सिग्नल तोडण्याची स्पर्धा

By Admin | Updated: June 20, 2014 00:16 IST2014-06-20T00:16:30+5:302014-06-20T00:16:30+5:30

नांदेड : वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासाठी सिग्नल महत्त्वपूर्ण ठरतात़ मात्र वाहनधारकांना या सिग्नलशी काहीही देणेघेणे नाही़

Signal Breakdown Competition | सिग्नल तोडण्याची स्पर्धा

सिग्नल तोडण्याची स्पर्धा

नांदेड : वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासाठी सिग्नल महत्त्वपूर्ण ठरतात़ मात्र वाहनधारकांना या सिग्नलशी काहीही देणेघेणे नाही़ वाहतूक कर्मचारी असेल तर ठीक अन्यथा सिग्नल तोडून मार्गस्थ होण्यातच नांदेडकर धन्यता मानतात़ जणू सिग्नल तोडण्यासाठी स्पर्धाच लागल्याची अनुभूती येत आहे़
नांदेड शहर १४ कि.मी. परिसरात विस्तारले आहे़ जिल्ह्याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय कार्यालयाचे मुख्यालय येथे आहे़ बहुतांश कार्यालये मुख्य रस्त्यावर आहेत़ कार्यालये सुरु होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते़ यात बाहेरुन येणाऱ्या वाहनांची भर पडते़
वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शहरात बारा ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहेत़ मुख्य रस्त्यावर तरोडा नाका, राज कॉर्नर, वर्कशॉप कॉर्नर, आयटीआय चौक, फुले मार्केट, कलामंदीर, वजिराबाद चौरस्ता, चिखलवाडी येथे सिग्नल आहेत़ तसेच व्हीआयपी रोडवर आयटीएम कॉलेज व अण्णाभाऊ साठे चौकात सिग्नल आहे़ याशिवाय देगलूर नाका व लातूर फाट्यावर नव्याने सिग्नल बसविण्यात आले आहेत़
वाहनांची सर्वाधिक वर्दळ आयटीआय चौक, कलामंदीर व वजिराबाद चौरस्त्यावरील सिग्नलवर आहे़ शासकीय कार्यालये सुरु होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत काही प्रमुख सिग्नलवर थांबून लोकमत चमूने पाहणी केली़ सर्वसामान्य वाहनधारक तर सोडाच शासकीय सेवेतील कर्मचारीही वाहतूक नियमांचे गांभीर्याने पालन करीत नसल्याचे दिसून आले़ वाहतूक कर्मचारी समोर असेपर्यंत वाहनधारक सिग्नलवर थांबतात़ मात्र कर्मचाऱ्याचा कानाडोळा होताच वाहनधारक सुसाट वेगाने मार्गस्थ होतात़
याच मार्गावरील फुले मार्केट येथील सिग्नलवर तर एकही वाहनधारक सिग्नलचे पालन करताना आढळून आला नाही़ गणेशनगरकडे जाणाऱ्या आॅटोचालकांनी हा रस्ता पूर्णत: ताब्यात घेतल्याने सिग्नलवर थांबावे की मार्ग काढावा अशी द्विधा मनस्थिती वाहनधारकांची होते़ वजिराबाद चौरस्त्यावर वाहतूक कर्मचारी उपस्थित असल्याने सिग्नलचे पालन केल्या जात असल्याचे दिसून आले़ कलामंदीर, चिखलवाडी येथेही वाहनधारक सिग्नल तोडून धावत होते़ यात आॅटोचालक व दुचाकीस्वार पुढे होते़ अण्णाभाऊ साठे चौकातील सिग्नलवर बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती़ आयटीएम कॉलेजसमोरील सिग्नलवर एकही वाहन थांबत नसल्याचे दिसून आले़ लातूर फाटा येथील सिग्नल बंद होते़
कलामंदीर परिसरात होणारी वाहनांची कोंडी सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी रस्त्यावर उतरले होते़ आॅटोचालकांना थांब्यावर थांबण्याची सूचना ध्वनीक्षेपकावर केली जात होती़ काही सिग्नलवर अतिरिक्त कर्मचारी नेमण्यात आले होते़ (प्रतिनिधी)
उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार
शहरात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी १२ ठिकाणी सिग्नल्स बसविलेले आहेत़ सिग्नलची देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे़ जुने व नव्याने बसवलेले सर्व सिग्नल्सच्या देखभालीचे कंत्राट मनपाने बंगळुरू येथील कंपनीला दिले आहे़ सिग्नलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास सदरील कंपनीचे तंत्रज्ञ उपलब्ध होण्यास काही दिवसांचा कालावधी लागतो़ सिग्नल दुरुस्तीसाठी बंगळुरू येथून पथक मागविणे म्हणजे उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे़ सर्वाधिक वर्दळ असलेल्या आयटीआय चौक व वजिराबाद चौरस्त्यावरील सिग्नलमध्ये गत चार दिवसांपासून बिघाड झाला आहे़

Web Title: Signal Breakdown Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.