तपासणीसाठी पथक दाखल होताच दुकानांचे शटर डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:05 IST2021-04-13T04:05:16+5:302021-04-13T04:05:16+5:30
खुलताबाद : शहरात कोरोनाची तपासणी करण्यासाठी तालुका प्रशासन सोमवारी दुपारी जुना बसस्थानक परिसरात दाखल होताच. पाच मिनिटात दुकानदार व ...

तपासणीसाठी पथक दाखल होताच दुकानांचे शटर डाऊन
खुलताबाद : शहरात कोरोनाची तपासणी करण्यासाठी तालुका प्रशासन सोमवारी दुपारी जुना बसस्थानक परिसरात दाखल होताच. पाच मिनिटात दुकानदार व व्यापाऱ्यांनी दुकाने पटापट बंद करून धुम ठोकली अन् अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत सर्वत्र शुकशुकाट झाला होता.
खुलताबाद भागात काही दिवसांपासून अनेक जण विनाकारण फिरू लागले आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेबरोबरच इतर दुकानेही काही प्रमाणात खुली असल्याचे दिसून आले. त्यामुळे उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे, तलाठी सचिन भिंगार, नगर परिषदेचे संभाजी वाघ, अंकुश भराड, शहेजाद बेग, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी हे व्यापारी व दुकानदार यांची कोरोना तपासणी करण्यासाठी जुना बसस्थानक परिसरात दाखल झाले.
कोरोना तपासणी करून घ्यावी लागणार, असे लाऊडस्पीकरद्वारे सांगताच अवघ्या पाच मिनिटात दुकानदारांनी दुकाने पटापट बंद करून पळ काढला. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसायला लागला. यावेळी काही दुकानदारांनी व ग्राहकांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यानंतर नगर परिषद कार्यालय परिसरातील दुकानदारांची तपासणी करण्यात आली. आज दिवसभरात ६५ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात चार जण बाधित आढळून आले आहेत. खुलताबाद कोविड सेंटरमध्ये एकूण २१ रुग्ण आहेत. त्यात दरेगाव १, वेरूळ ५, धामणगाव १, तीसगाव ३, पातळी १, कानडगाव १, वडोद १, झरी १, भडजी १, बाजार सावंगी १, मावसाळा १, खुलताबाद ४ अशा बाधित रुग्णांचा समावेश आहे.
फोटो : खुलताबाद बसस्थानक परिसरातील दुकानदार व व्यापारी व कामगार यांची कोरोना तपासणीबाबत विचारणा करताना तहसीलदार सुरेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे.
120421\sunil gangadhar ghodke_img-20210412-wa0054_1.jpg
खुलताबाद