जिल्हाभर श्रीरामांचा जयघोष
By Admin | Updated: April 4, 2017 23:16 IST2017-04-04T23:16:08+5:302017-04-04T23:16:51+5:30
ब्ाीड : ‘श्रीराम.. राम.. जयजय राम... श्रीराम चंद्र की जय...’ अशा जयघोषात मंगळवारी जिल्ह्यात रामनवमी साजरी झाली.

जिल्हाभर श्रीरामांचा जयघोष
ब्ाीड : ‘श्रीराम.. राम.. जयजय राम... श्रीराम चंद्र की जय...’ अशा जयघोषात मंगळवारी जिल्ह्यात रामनवमी साजरी झाली. भगवे झेंडे... डोक्यावर फेटे व गळ्यात भगवे रुमाल अशा सळसळत्या उत्साहात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.
प्रभू श्रीराम यांच्या जन्मदिनानिमित्त सकाळपासूनच सर्व राम मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. विविध भागांमधून निघालेल्या दुचाकी रॅलीने शहराला वळसा घातला. अनेक रॅली कंकालेश्वर मंदिरात पोहोचल्या. श्रीकृष्ण मंदिरात अभिषेक, महाआरती घेण्यात आली. यावेळी ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला..’ हा भजन कार्यक्रमही पार पडला. दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती.
सायंकाळी सहा वाजेपासून शहरातील कंकालेश्वर मंदिरापासून प्रभू श्रीराम यांची प्रतिमा मिरवणूक निघाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माळीवेस, सुभाष रोड, जालना रोडमार्गे ही मिरवणूक रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोहोचली.
यावेळी अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे, सहायक अधीक्षक विशाल आनंद, उपअधीक्षक गणेश गावडे यांच्यासह तिन्ही ठाण्यांचे अधिकारी, गुन्हे शाखेचे अधिकारी- कर्मचारी मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. शेकडो पोलीस कर्मचारी बंदोबस्तकामी तैनात केले होते.
सामाजिक सलोख्याचे दर्शन
बीड शहरातून निघालेल्या भव्य मिरवणुकीदरम्यान समााजिक सलोख्याचे दर्शन घडले. मुस्लिम बांधवांच्या वतीने माळीवेस भागात मिरवणुकीत सहभागी भाविकांना मोफत पाणी वाटप करण्यात आले. पालिकेचे माजी सभापती खुर्शीद आलम व शेख आयुब यांच्या वतीने ही सोय करण्यात आली होती. उन्हाच्या तीव्रतेने निर्माण झालेल्या काहिलीत थंड पाण्याने मोठा दिलासा मिळाला. ठिकठिकाणी फराळाची व्यवस्थाही केली होती. (प्रतिनिधी)