श्रीराम जन्मोत्सव उत्साहात
By Admin | Updated: April 4, 2017 23:13 IST2017-04-04T23:11:46+5:302017-04-04T23:13:11+5:30
लातूर : शहरासह जिल्हाभरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला.

श्रीराम जन्मोत्सव उत्साहात
लातूर : शहरासह जिल्हाभरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. शहरातील कोकाटे नगरातील राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाचा पाळणा घालण्यात आला. गावभागातील राम गल्लीतील राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, प्रवचन, कीर्तन, भजन झाले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तर रूई रामेश्वर येथे माईर्स एमआयटी संस्थेच्या वतीने श्रीराम-रहीम सेतूचे लोकार्पण करण्यात आले.
प्रकाश नगरमधील गजानन महाराज मंदिर, बोधेनगरातील संत नामदेव मंदिर, बार्शी रोडवरील श्री हनुमान मंदिर, औसा हनुमान मंदिरात श्रीरामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. महिला भाविकांनी श्रीराम जन्मोत्सवाचा गाऊन उत्सव साजरा केला. प्रकाशनगर येथील गजानन महाराज मंदिरात श्रीराम-लक्ष्मण-सीता आणि हनुमानाची पूजा करून महाआरती करण्यात आली. यावेळी गजानन महाराज भजनी मंडळाने श्रीराम स्तुतीपर भजने गायली. मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती.
लातूर तालुक्यातील रामेश्वर (रूई) येथे माईर्स एमआयटी संस्थेच्या वतीने सोनवळा नदीवर उभारण्यात आलेल्या विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतूचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, माईर्सचे संस्थापक प्रा.डॉ. विश्वनाथ कराड, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, माजी केंद्रीय मंत्री अरिफ मोहम्मद खान, डॉ. राजेंद्र शेंडे, माजी खा.डॉ. गोपाळराव पाटील, वेदप्रताप वैदिक, फिरोज बख्त अहेमद, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु एस.एन. पठाण, तुळशीराम दा. कराड, काशीराम दा. कराड, प्रा. राहुल विश्वनाथ कराड, प्रा.डॉ. मंगेश कराड, रमेश कराड आदी उपस्थित होते.