श्रेयस तळपदे साधणार आज तरुणाईशी संवाद
By Admin | Updated: October 9, 2014 00:51 IST2014-10-09T00:33:41+5:302014-10-09T00:51:16+5:30
औरंगाबाद : प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याच्याशी दिलखुलास संवाद साधण्याची सुवर्णसंधी ९ आॅक्टोबर रोजी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

श्रेयस तळपदे साधणार आज तरुणाईशी संवाद
औरंगाबाद : ‘ओम शांती ओम’ चित्रपटात शाहरुख खानसोबतचा ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’चा संवाद... ‘इकबाल’ या चित्रपटातील अभिनयातून तरुणाईला आपल्या ध्येयासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देणारा आणि हिंदी- मराठी चित्रपटांतील अभिनयातून चित्रपट रसिक आणि तरुणाईच्या मनावर राज्य करणारा प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याच्याशी दिलखुलास संवाद साधण्याची सुवर्णसंधी ९ आॅक्टोबर रोजी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
शहरातील एमजीएम जर्नालिझम कॉलेजमध्ये सकाळी ११ वाजता श्रेयस तळपदे एमबीए आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. यानंतर दुपारी १२ वाजता वसंतराव नाईक कॉलेजमध्ये आणि दुपारी १ वाजता छत्रपती महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना श्रेयस तळपदे याच्याशी मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळाली आहे.
मराठीतील ‘पछाडलेला’, ‘सावरखेड एक गाव’, ‘आईशप्पथ’, हिंदीतील ‘इकबाल’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘ओम शांती ओम’, ‘बॉम्बे टू बँकॉक’, ‘आशाएँ’, ‘वेलकम टू सज्जनपूर’ यासह अनेक चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर श्रेयस तळपदे याने अधिराज्य गाजविले आहे. ‘गोलमाल रिटर्न्स’मधील भूमिकेने चित्रपट रसिकांना खळखळून हसविले. चित्रपटसृष्टीत चमकणाऱ्या श्रेयस तळपदेला भेटण्याची संधी म्हणजे तरुणाईला अनोखी मेजवानीच ठरणार आहे.
व्हॉट्सअप, फेसबुकवर शेअर
श्रेयस तळपदेची एंट्री... त्याच्याभोवती शेकडो तरुण- तरुणींचा गराडा... त्याची एक छबी टिपण्यासाठी फ्लॅश मारत सर्वांचे मोबाईल आणि कॅमेरे उंचावणार, असेच काहीसे चित्र गुरुवारी महाविद्यालयांत दिसून येईल. अनेक जण हा क्षण व्हॉट्सअप, फेसबुकवर शेअर करणार यात दुमत नाही.