दुचाकी खरेदीसाठी उडाली झुंबड
By Admin | Updated: April 1, 2017 00:21 IST2017-04-01T00:20:39+5:302017-04-01T00:21:10+5:30
उस्मानाबाद : बीएस-चार (भारत स्टेज-फोर) उत्सर्जन निकषांचे पालन न करणाऱ्या वाहनांच्या विक्री तसेच नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिलपासून बंदी घातली आहे

दुचाकी खरेदीसाठी उडाली झुंबड
उस्मानाबाद : बीएस-चार (भारत स्टेज-फोर) उत्सर्जन निकषांचे पालन न करणाऱ्या वाहनांच्या विक्री तसेच नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिलपासून बंदी घातली आहे. या आदेशान्वये बीएस-३ वाहनांची ना विक्री करता येणार ना नोंदणी. त्यामुळे सर्वच प्रमुख दुचाकी, चारचाकी वाहने निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी सदरील वाहने खरेदीवर विशेष सूट दिली होती. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून शहरातील प्रमुख शोरूममध्ये ग्राहाकांची अक्षरश: झुंबड उडाली होती. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत हजारावर दुचाकींची नोंदणी ‘आरटीओ’ कार्यालयाकडे झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.स्पर्धेच्या युगात वेळेला महत्त्व आले आणि ही वेळ वाचविण्यासाठी वाहनांचा वापर वाढला आहे़ पेट्रोल-डिझेलवरील वाहने रस्त्यावर वाढली आहेत़ वाहने वाढली असली तरी या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याची बाब एका याचिकेतील सुनवाईदरम्यान न्यायालयासमोर आली. याबाबत बीएस-चार उत्सर्जन निकषांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही वाहनांच्या म्हणजेच प्रदूषण करणाऱ्या बीएस-३ वाहनांची विक्री तसेच नोंदणी सर्वाच्च न्यायालयाने मनाई केली आहे़ या आदेशाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर लाखो वाहने भंगारात निघणार असल्याच्या भीतीने सर्वच प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांकडून शुक्रवारी वाहनाच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट दिली होती. वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट मिळाल्याने अनेकांनी वाहन खरेदीसाठी शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील दुचाकी, चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये गर्दी केली होती़
विशेष म्हणजे शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील, शेजारील तालुका, जिल्ह्यातील नागरिकांनीही सकाळपासूनच विविध शो रूममध्ये वाहन खरेदीसाठी गर्दी केली होती़ सायंकाळी ही गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा होती़ मात्र, रात्री १० वाजेपर्यंतही शहरातील बहुतांश शो-रूममध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली़ दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या गुडी पाडव्याला अनेकांनी वाहने खरेदी केली होती़ उपलब्ध किंमतीत नवी वाहने खरेदी करून दोन दिवसांचा अवधी लोटतो न लोटतो तोच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वाहन कंपन्यांनी नव्या-कोऱ्या वाहनांवर मोठी सूट दिली होती़ याबाबत सोशल मीडियामध्येही मोठ्या प्रमाणात विडंबनात्मक विनोद दिवसभर दिसून आले़ तर न्यायालयाचा निर्णय आणि कंपन्यांची, विक्रेत्यांची उडालेली तारंबळ याबाबतही चवीने चर्चा होत होती़ शहरासह जिल्ह्यातील वाहन विक्रीच्या शो- रूममध्ये रात्री उशिरापर्यंत जवळपास १२०० हून अधिक वाहनांची विक्री झाल्याचे समजते. यात सर्वाधिक विक्री ही विविध कंपन्यांच्या दुचाकीची झाल्याचे वृत्त आहे़ दरम्यान, एक एप्रिलपासून बीएस-थ्री ची वाहने विक्रीवर बंदी आहे़ रात्री १२ पर्यंत जितकी वाहने विक्री होऊन नोंदणी होईल, तीच वाहने रस्त्यावर उतरतील, अन्यथा उर्वरित वाहने भंगारात विकण्याशिवाय पर्याय नसल्याचे काही वाहन विक्रेत्यांनी सांगितले.