श्रमनिद्रेस प्रारंभ
By Admin | Updated: October 5, 2014 00:48 IST2014-10-05T00:47:18+5:302014-10-05T00:48:36+5:30
तुळजापूर : ‘आई राजा उदोऽऽ उदोऽऽऽ’ च्या गजरात शनिवारी पहाटे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे सिमोल्लंघन उत्साहात पार पडले़ संबळाचा निनाद, आराध्यांची गाणी,

श्रमनिद्रेस प्रारंभ
तुळजापूर : ‘आई राजा उदोऽऽ उदोऽऽऽ’ च्या गजरात शनिवारी पहाटे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे सिमोल्लंघन उत्साहात पार पडले़ संबळाचा निनाद, आराध्यांची गाणी, कुंकवाची उधळण करीत एकमेकांना आपट्याची पाने देवून नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या़
श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शनिवारी पहाटे एक वाजता देवीची नित्योपचार अभिषेक पूजा झाली़ त्यानंतर महंत व भोपे पुजारी यांनी देवीच्या मूर्तीस १०८ साडीवस्त्रांचा दिंड लावला व बऱ्हाणपूर येथून आलेल्या पलंग पालखीत देवीस बसविण्यात आले. त्यानंतर मंदिरास एक प्रदक्षिणा घालण्यात आली़ मंदिरातील पिंपळपारावर पालखी सिमोल्लंघनासाठी विसावल्यानंतर भोपी पुजाऱ्यांनी आणलेले घुगऱ्या, करंज्या याचा नैवेद्य देवीस दाखवून आरती करण्यात आली़ यानंतर उपस्थित पुजारी, भाविकांनी आपट्याची पाने, कुंकवाची उधळण करून ‘आई राजा उदोऽऽ चा जयघोष करीत’ संबळाच्या वाद्यात देवीचे सिमोल्लंघन केले़ यानंतर पालखी मंदिरातील सिंह गाभाऱ्यात आणण्यात आली़ या ठिकाणच्या पलंगावर देवीस चार दिवस श्रमनिद्रेस ठेवण्यात आले. सदरची श्रमनिद्रा बुधवारी पहाटेपर्यंत चालणार आहे़ या दिवशी रात्री छबिना मिरवणूक होवून ९ आॅक्टोबर रोजी अन्नदान, महाप्रसाद, छबीना व जोगवा या धार्मिक विधीने शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.
शनिवारी सिमोल्लंघनानंतर मंदिर संस्थानच्या वतीने अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी पालखीचे मानकरी भगत कुटूंब यांचा प्रथेनुसार भरपेहरावा आहेर देवून सत्कार केला़
सिमोल्लंघन सोहळ्यावेळी महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, भोपी पुजारी अॅड़धीरज पाटील, अमर परमेश्वर, सचिन पाटील, सुधीर कदम, शशिकांत पाटील, भाऊसाहेब मलबा, दिनेश परमेश्वर, गब्बर सोंजी, सचिन परमेश्वर, पाळीकर पुजारी किशोर गंगणे, कुमार इंगळे, राजकुमार रोचकरी, प्रशांत गंगणे, सचिन अमृतराव, उपाध्ये अनंत कोंडो, नागेश अंबुलर्गे, सेवेकरी पलंगे, पवेकर, छत्रे, औटी, गोंधळी अनंत रसाळ, राजेंद्र गायकवाड, आराधी, व्यवस्थापक तहसीलदार सुजीत नरहरे, तहसीलदार काशिनाथ पाटील, सह व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, युवराज नळे, पालखीचे मानकरी अर्जुन भगत, बद्रीनाथ भगत, आगळगावचे पालखी सेवेकरी आदींसह देवीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते़ यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मोहन विधाते, पोनि ज्ञानोबा मुंडे यांनी बंदोबस्तावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत कडक बंदोबस्त ठेवला. (वार्ताहर)
बुधवारी मूर्तीची पूर्ववत प्रतिष्ठापणा
४नऊ दिवसांच्या शारदीय नवरात्रोत्सवानंतर शनिवारपासून श्री तुळजाभवानी मातेच्या श्रमनिद्रेस प्रारंभ झाला. बुधवारी (८ आॅक्टोबर) पहाटे देवीची मूर्ती सिंहासनावर पूर्ववत प्रतिष्ठापित होवून विविध धार्मिक विधीनंतर विशेष अभिषेक पूजेस प्रारंभ होणार आहे. या विशेष पूजेनंतर दोन तास अलंकार पूजा मांडून भाविकांच्या दर्शनास सुरूवात होते. सकाळी नित्योपचार अभिषेक पूजा, अंगारा, नैवेद्य, अलंकार पूजा आदी धार्मिक विधी होवून रात्री छबिना काढला जाणार आहे. या छबिन्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे सोलापूर येथील लाड समाजाच्या मानाच्या काठ्या, महंतांचा जोगवा या छबिन्यासोबत असतो. श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातून तीन मंचकी निद्रा होतात. यात शाकंभरीतील मोहनिद्रा, नवरात्रीतील घोरनिद्रा आणि नवरात्रानंतरची श्रमनिद्रा. म्हणजेच एकूण २१ दिवस देवी मंचकी निद्रा घेते. त्यामुळे तुळजाभवानीची मूर्ती ही चल म्हणून ओळखली जाते. या तिन्ही निद्रेवेळी देवीला दह्या-दुधाऐवजी सुवासिक तेलाचा दोन वेळा अभिषेक होतो. या कालावधीत भाविकांची संख्याही रोडावलेली असते.