रस्ता दाखवतोय शहराचा दळभद्रीपणा

By Admin | Updated: October 29, 2014 00:43 IST2014-10-29T00:29:59+5:302014-10-29T00:43:59+5:30

संतोष धारासूरकर ,जालना जागोजागी खचलेला अन् उखडलेला रस्ता... त्यावर फुटाफुटाला खड्डेच खड्डे... ते सुद्धा गुडघ्या-कमरेएवढ्या आकाराचे... प्रत्येक खड्डा अ‍ॅटेंड करणे अनिवार्य.

Showing the road to the city's ambiguity | रस्ता दाखवतोय शहराचा दळभद्रीपणा

रस्ता दाखवतोय शहराचा दळभद्रीपणा


संतोष धारासूरकर ,जालना
जागोजागी खचलेला अन् उखडलेला रस्ता... त्यावर फुटाफुटाला खड्डेच खड्डे... ते सुद्धा गुडघ्या-कमरेएवढ्या आकाराचे... प्रत्येक खड्डा अ‍ॅटेंड करणे अनिवार्य... त्याशिवाय पुढे सरकणेच अशक्य... खड्डा चुकवाल तर अपघात अटळच... त्यामुळेच आदळाआपट करा अन पल्ला गाठा... जगावेगळ्या भोकरदन रस्त्याचा हा मूलमंत्रच !
रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता या व्यावहारिक सर्वश्रूत वाक्यप्रचाराची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे जालना ते तीर्थक्षेत्र राजूर मार्गे भोकरदन रस्ता. जालन्यातील भोकरदन नाक्यावरून वळाल्याबरोबर बालाजी चौकात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे तर काही अंतरावर उद्योगपती बद्रीनारायण बारवाले यांचे निवासस्थान. तेथून पुढे औरंगाबाद ते देऊळगावराजा बायपास. तो चौक ओलांडल्यानंतर जगावेगळा तो राजूर रस्ता.
जालन्यापासून तीर्थक्षेत्र राजूर हे २५ कि़मी.वर. तेथून पुढे भोकरदन २६ कि़मी., जालना ते भोकरदन या दोन शहरांचा मध्यबिंदू म्हणजे राजूर. एकूण ५० ते ५२ कि़मी.चा हा रस्ता. पश्चिम महाराष्ट्र ते खान्देश किंवा मध्यप्रदेश, गुजरातला जोडणारा. १८१ क्रमांकाचा हा राज्यमार्ग. साहजिकच अत्यंत वर्दळीचा हा रस्ता. पहाटेपासून मध्यरात्री उशिरापर्यंत, चोवीस तास म्हणा या रस्त्यावरून हलक्या व जड वाहनांची प्रचंड अशी वाहतूक़ परिणामी या रस्त्यास अनन्यसाधारण असे महत्व. परंतु या रस्त्याचे दुर्देव असे, तो आहे दुहेरी आणि अरूंद. दोन राज्यांना जोडणाऱ्या या राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव होता. दहा वर्षांपासून त्याचा बोलबालाच. प्रत्यक्षात प्रस्ताव मार्गी लागावा म्हणून अधिकारी असो की, लोकप्रतिनिधी यांनी आजवर काडीचेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे चौपदरीकरण म्हणजे काय, हे या भागास उमजलेच नाही !
चौपदरीकरण तर राहिले दूरच, दुर्देव असे की, वर्षानुवर्षांपासून हा राज्यमार्ग दळभद्री अवस्थेत आहे. भयावह अवस्थेतील हा रस्ता, या भागातल्या मागासलेपणासह दळभद्री मानसिकताही दाखवित आहे. कारण ५० - ५२ कि़मी.च्या रस्त्यावर ५० फूटसुद्धा खड्यांविना रस्ता अस्तित्वात नाही. केंद्रीयमंत्री दानवे यांच्या निवासस्थानापासून खड्डेमय रस्त्यास सुरूवात होते, ते भोकरदनपर्यंत. जागोजागी खचलेला, पूर्णत: उखडलेल्या या रस्त्यावर फुटाफुटावर खड्डेच खड्डे आहेत. काही छोटे तर काही मोठे. काही गुडघ्याएवढे तर काही कमरेएवढ्या आकाराचे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना प्रत्येक खड्डा अ‍ॅटेंड केल्याशिवाय पर्यायच नाही. कारण चुकवावा तरी कोणता खड्डा. त्यामुळे प्रत्येक खड्डयात आदळाआपट केल्याशिवाय पुढे सरकणेच अशक्य ठरते आहे.
बायपासवरील चौफुलीपासून मानदेऊळगाव, बावणेपिंपळगाव, पांगरी, तुपेवाडी, वसंतनगर ते राजूरपर्यंतच्या रस्त्यावर हजारो खड्डे आहेत. रस्त्यात खड्डा की, खड्डयात रस्ता या वाक्यप्रचाराचा अनुभव जणू हा रस्ता दाखवतो आहे. कारण राजूरपर्यंत २५ कि़मी. अंतरावरच्या रस्त्यावर २५ फूटसुद्धा चांगल्या अवस्थेतील रस्ता अस्तित्वात नाही. पुढे तर आनंदीआनंदच.
केंद्रीयमंत्री दानवे यांच्या बालेकिल्ल्यापर्यंत म्हणजे भोकरदनपर्यंत रस्त्याची अक्षरश: चाळणीच झाली आहे. तोही सरासरी २६ कि़मी. चा रस्ता पूर्णत: उखडलेला आहे.
जालन्यापासून राजूरमार्गे भोकरदनपर्यंत ५० कि़मी. अंतर गाठावयास खरेतर वाहनाद्वारे एक तासाचा अवधी लागावा. परंतु जगावेगळ्या दिव्य अशा रस्त्यावरून भोकरदन गाठण्यासाठी दोन ते सव्वादोन तास वाहनधारकांना अवधी लागतो आहे. कारण या रस्त्यावरून वाहने २० ते ३० च्या ताशी वेगानेच चालवावी लागतात. त्यात प्रत्येक खड्डा अ‍ॅटेंड करावाच लागतो. खड्डयाचे दर्शन घेतल्याशिवाय वाहन पुढे सरकूच शकत नाही. खड्डयास वळसा घातला तर अपघात हा अटळच. त्यामुळे या राज्य मार्गावरून दररोज हजारो वाहने, वाहनधारक मोठा मनस्ताप, इंधनाचा खर्च, वेळेचा अपव्यय सहन करीत ये-जा करीत आहेत. (क्रमश....)

Web Title: Showing the road to the city's ambiguity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.