बीडीओंना ‘कारणे दाखवा’ नोटीस
By Admin | Updated: August 21, 2015 00:41 IST2015-08-21T00:35:43+5:302015-08-21T00:41:58+5:30
लातूर : औसा तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची विविध कामे करण्यात आली होती़ केलेल्या कामाचे रेकॉर्ड घरी घेऊन जाणे, केलेल्या कामात

बीडीओंना ‘कारणे दाखवा’ नोटीस
लातूर : औसा तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची विविध कामे करण्यात आली होती़ केलेल्या कामाचे रेकॉर्ड घरी घेऊन जाणे, केलेल्या कामात अनियमितता आणि नियमबाह्यता निदर्शनास आल्याने औशाचे गटविकास अधिकारी अनंत कुंभार यांना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
औसा तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्ते, सिंचन विहिरी, वृक्षारोपण, वैयक्तिक शौचालये अशी विविध कामे करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक कामे औसा तालुक्यात झाली आहेत. रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेली कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याची ओरड नागरिकांतून तसेच जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांकडून झाली होती. रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या कामाच्या अनियमितता तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत खोदण्यात आलेली विहीर चोरीला गेल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या सर्व प्रकाराची दखल जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी घेतली तसेच संबंधित कामाबाबत माहिती घेण्यासाठी चौकशी नियुक्त केली होती. या समितीने औसा तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामाची चौकशी केली़ तसेच जिल्हा परिषदेच्या नरेगा कक्षाकडून रोजगार हमीच्या कामाची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ संजय तुबाकले, नरेगा कक्षाचे गटविकास अधिकारी शिवराज केंद्रे यांनी केली़ यात ६० टक्के व ४० टक्के काम झाल्याचे निदर्शनास आले. सिंचनाची कामे अधिक करणे आवश्यक होते. मात्र ही कामे न करता रस्त्यांची कामे अधिक केल्याचे प्रमाण या पाहणीत आढळले. कामाच्या प्रमाणाचा समतोल राखता आला नसल्याचे समितीच्या निदर्शनास आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी गटविकास अधिकारी अनंत कुंभार यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे़ (प्रतिनिधी)