मासिक पाळीत, गर्भवतींनी लस घ्यावी का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST2021-05-05T04:07:56+5:302021-05-05T04:07:56+5:30
औरंगाबाद : सोशल मीडियावर सध्या लसीकरणाबाबत विशेषतः मासिक पाळी असताना किंवा गरोदर असताना कोविड लस घेऊ नये, अशा खोट्या ...

मासिक पाळीत, गर्भवतींनी लस घ्यावी का?
औरंगाबाद : सोशल मीडियावर सध्या लसीकरणाबाबत विशेषतः मासिक पाळी असताना किंवा गरोदर असताना कोविड लस घेऊ नये, अशा खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. मात्र, या काळात तरुणी, महिलांनी कोविड लस घेण्यास हरकत नाही. फक्त त्याआधी डॉक्टरांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे, असे मत शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मासिक पाळीदरम्यान किंवा गर्भधारणेनंतर कोविड लस घेतली तर धोकादायक ठरू शकते, या सोशल मीडियावरील मेसेजने महिला वर्गात गोंधळ उडाला आहे. त्यासंदर्भात ‘लोकमत’ने शहरातील काही स्त्रीरोग तज्ज्ञांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, भारतात सध्या कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी देण्यास भारत सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र, या लसीचा मासिक पाळी असणाऱ्या महिला किंवा गर्भवतींवर काय परिणाम होतो, यावर अजून परीक्षण झालेले नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने गर्भवती महिलांना इशारा दिला आहे की, मॉडर्ना ही लस घेऊ नये. कोरोनाचा जास्त धोका असेल तरच लस घ्यावी. मात्र, मॉडर्ना ही लस भारतात विक्रीला परवानगी देण्यात आलेली नाही.
तसेच भारतात केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने, गरोदर महिलांनी व स्तनपान देणाऱ्या महिलांनी कोविड लस घेऊ नये, असे स्पष्ट केल्याचे डॉक्टरनी सांगितले. मात्र, मासिक पाळी व गरोदरपणात कोविड लस घेण्याचा सल्ला महिलांना देत असल्याचे काही स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितले. तर काहींच्या मते अजून त्यादृष्टीने संशोधन झाले नसल्याने, गरोदर महिलांनी लस घेऊ नये. त्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला दिला आहे.
चौकट
( प्रतिक्रिया )
गरोदर महिलेचा जीव महत्त्वाचा
मासिक पाळीचा व कोविड लस न घेण्याचा काही संबंध नाही. मासिक पाळीत कोविड लस घेण्यास काहीच हरकत नाही. तसेच कोरोनामुळे अनेक जणांचा जीव जात आहे. यामुळे गर्भवतींनी कोविड लस घ्यावी. कारण जीव महत्त्वाचा आहे. आई वाचली, तर बाळ वाचेल, असे माझे मत आहे.
- डॉ. राजेंद्रसिंग परदेशी
स्त्रीरोगतज्ज्ञ
---
मासिक पाळीत लस घ्यावी
मासिक पाळी येणे हे महिलांची नॉर्मल शारीरिक प्रक्रिया आहे. मासिक पाळीत लस घेणे धोकादायक आहे, असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. दुसऱ्या टप्प्यातील कोरोनामुळे गुंतागुंत वाढली आहे. यामुळे गरोदर काळात कोविड लस घेणे योग्यच आहे.
- डॉ. सोनाली देशपांडे
स्त्रीरोगतज्ज्ञ
---
देशात अभ्यास झालेला नाही
मासिक पाळीचा व कोविड लस न घेण्याचा शास्त्रीयदृष्ट्या संबंध नाही. यामुळे नंबर आला की, त्या दिवशी मासिक पाळी असली तरी लस घ्यावी. गरोदरपणात लस घेतली तर काही विपरित परिणाम होऊ शकतो, असे संशोधन भारतात अजून झालेले नाही. यामुळे अशा काळात स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा.
- डॉ. विशाखा देशपांडे
स्त्रीरोगतज्ज्ञ
----
चौकट
लसीकरणासंदर्भात केंद्राची गाईडलाईन काय सांगते...
भारतात केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने गरोदर महिलांनी व स्तनपान देणाऱ्या महिलांनी कोविड लस घेऊ नये, असे स्पष्ट सांगितले आहे.
-----
चौकट
* आरोग्य सेवा कर्मचारी : पहिला डोस- २६६९०
* दुसरा डोस- १२१७५
---
* फ्रंटलाईन वर्कर्स : पहिला डोस- ३३४७५
* दुसरा डोस : ८८००
--
* ६० वर्षांवरील : पहिला डोस - ५६४८१
* दुसरा डोस - १५३३६