गरिबांच्या उद्धाराचा विचार व्हावा
By Admin | Updated: March 28, 2015 00:46 IST2015-03-28T00:21:31+5:302015-03-28T00:46:59+5:30
औरंगाबाद : देशातील दीन, दलित, शोषित, वंचित, गरीब, शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग व्हावा, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

गरिबांच्या उद्धाराचा विचार व्हावा
औरंगाबाद : देशातील दीन, दलित, शोषित, वंचित, गरीब, शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग व्हावा, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५५ व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यापीठाच्या नाट्यगृहात शुक्रवारी झालेल्या या शानदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल चे. विद्यासागर राव होते. याप्रसंगी व्यासपीठावरील पहिल्या रांगेत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, कुलसचिव डॉ. गणेश मंझा, परीक्षा नियंत्रक डॉ. वाल्मीक सरवदे यांची उपस्थिती होती. दीक्षांत समारंभानिमित्त राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विद्यापीठात आज पहिल्यांदाच आगमन झाले. सकाळी ११.३० वाजता दीक्षांत मिरवणूक नाट्यगृहात पोहोचली. कार्यक्रमात १० विद्याशाखांच्या १६० पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना कुलपतींच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी दीक्षांत भाषणात नितीन गडकरी यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना ज्ञानाचा उपयोग देशातील गरिबी, उपासमारी व समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी करावा, असे आवाहन केले. शिक्षणाने माणूस मोठा होतो. देशात नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक आहे; पण गरिबी मात्र, या देशाचा पिच्छा सोडत नाही. असे असले तरी कोणताही देश साधनसंपत्तीने श्रीमंत ठरत नसतो, तर तेथे चारित्र्यवान नागरिक किती आहेत, यावरून त्या देशाची श्रीमंती ठरत असते. आता तुम्ही सारे जण नव्या पर्वात प्रवेश करत आहात. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक प्रगतीचा कायापालट करण्याची जिद्द बाळगली पाहिजे. संतांची भूमी म्हणून देशाची ओळख आहे. संतांनी कोणत्या विद्यापीठाची पदवी घेतलेली नव्हती; पण त्यांनी जी साहित्य रचना केली. जो विचार त्यांनी दिला. त्यावर आज पीएच.डी. केली जाते.
पदवीला कर्तृत्व आणि वर्तणुकीची जोड दिल्याशिवाय जीवनाला परिपूर्णता येत नाही. पदवीचा वापर करताना जीवनाच्या परीक्षेत चांगले उत्तीर्ण व्हा आणि या देशाचे चांगले नागरिक बना.
यावेळी गडकरी यांनी राबविलेल्या काही प्रयोगांची माहिती दिली. ते म्हणाले की, कापलेले केस जमा करून विकत घेण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यात बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. शिवाय कापलेल्या केसांपासून ‘अॅमिनो अॅसिड’ तयार करण्यात आले. त्याचा वापर शेतीसाठी करण्यात आला. ड्रेनेजमधून सोडून दिल्या जाणाऱ्या घाण पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी वीज निर्मितीसाठी वापरण्यात आले. कोट्यवधी रुपयांचा महसूल यातून मिळाला. टाकाऊपासून उपयुक्त वस्तू बनविण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. संशोधनाचा वापर यासाठी करावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ. चोपडे यांनी केले. प्रारंभी डॉ. संजय मोहोड व डॉ. जयंत शेवतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यशास्त्र विभाग व स. भु. महाविद्यालयाच्या चमूने राष्ट्रगीत व विद्यापीठगीत सादर केले. डॉ. समाधान इंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, आ. अतुल सावे, माजी आ. श्रीकांत जोशी आदींची उपस्थिती होती.