लघु सिंचनाच्या कामांचा धडाका
By Admin | Updated: August 31, 2014 00:40 IST2014-08-31T00:39:43+5:302014-08-31T00:40:51+5:30
सुनील कच्छवे, औरंगाबाद विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जलसंपदा विभागाने विकासकामांचा धडाका लावला आहे.

लघु सिंचनाच्या कामांचा धडाका
सुनील कच्छवे, औरंगाबाद
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जलसंपदा विभागाने विकासकामांचा धडाका लावला आहे. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत लघु सिंचन विभागाने सिमेंट नाला बांध आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या तब्बल १९ कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. यातील बहुतांश कामे ही औरंगाबाद आणि सिल्लोड तालुक्यांत होणार आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी जलसंपदा विभागात विविध विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यावर भर देण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात लघु सिंचन (जलसंधारण) विभागाने नुकत्याच ६० कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.
या कामांची एकत्रित किंमत तब्बल १९ कोटी १० लाख ५९ हजार रुपये एवढी आहे. यातील ज्या निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांना वर्कआॅर्डर देण्याची लगबग सध्या या विभागात दिसून येत आहे.
जिल्ह्यात मागील वर्षभरात जलसंधारण विभागांतर्गत जेवढी कामे झाली त्यापेक्षा कितीतरी अधिक रकमेच्या निविदा या दहा दिवसांत निघाल्या आहेत.
औरंगाबादप्रमाणेच लघु सिंचन विभागाने मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतही कोल्हापुरी बंधारे आणि सिमेंट नाला बांधाच्या कामांचा धडाका लावला आहे. याशिवाय जलसंपदा खात्यातील दरवाजे निर्माण युनिटच्या कार्यालयानेही २ कोटी २ लाख रुपयांच्या दरवाजे दुरुस्तीच्या कामांच्या निविदा काढल्या आहेत.
२६ कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामांची किंमत- १० कोटी ८ लाख
३४ सिमेंट नाला बांधाच्या कामांची किंमत- ९ कोटी २ लाख