व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने; पण पोलिसांच्या इशाऱ्याने पुन्हा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:02 IST2021-04-13T04:02:21+5:302021-04-13T04:02:21+5:30
औरंगाबाद : शहरातील व्यापाऱ्यांनी एकजूट होऊन सोमवारी सकाळी १० वाजता दुकाने उघडली. मात्र, ‘जिल्हाधिकारी यांचे कोणतेही आदेश नाहीत, त्यामुळे ...

व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने; पण पोलिसांच्या इशाऱ्याने पुन्हा बंद
औरंगाबाद : शहरातील व्यापाऱ्यांनी एकजूट होऊन सोमवारी सकाळी १० वाजता दुकाने उघडली. मात्र, ‘जिल्हाधिकारी यांचे कोणतेही आदेश नाहीत, त्यामुळे दुकाने उघडू नये, आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल,’ असा इशारा पोलिसांनी दिला. त्यामुळे विविध भागांतील दुकाने काही मिनिटांतच पुन्हा बंद झाली.
राज्यातील वरिष्ठ व्यापारी संघटनांच्या बैठकीत सोमवारपासून सर्व व्यापारी प्रतिष्ठाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण लॉकडाऊन लागण्यापूर्वी कामगारांचे वेतन, बँकांचे हप्ते, जीएसटीची कामे आदींसाठी दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत दुकाने उघडी ठेवण्याचे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाने केले होते. त्यानुसार सोमवारी सकाळीच पैठण गेट, गुलमंडी, राजा बाजार, सराफा, सिटी चौक, जवाहर काॅलनी, सिडको-हडको भागांतील व्यापारी, कामगार दुकानांसमोर जमले होते. सकाळी १० वाजताच व्यापाऱ्यांनी दुकानांचे शटर उघडले. यावेळी काहींनी केवळ अर्धे शटर उघडे ठेवण्यास प्राधान्य दिले, तर काहींनी पूर्ण दुकान उघडून सामानाची मांडणी केली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास पैठण गेट, गुलमंडी परिसरात पोलिसांची वाहने पोहोचली. ध्वनिक्षेपकाद्वारे व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याची सूचना देण्यात आली. दुकाने उघडली तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे त्यानंतर व्यापाऱ्यांनी उघडलेली दुकाने पुन्हा बंद केली.
अशीच काहीशी स्थिती शहरातील विविध भागांत राहिली. कारवाईच्या भीतीने कुठे दुकाने बंद होती. कोणी अर्धे शटर उघडून बसले होते. बंद शटरसमोर व्यापारी दिवसभर दुकानांसमोर बसून होते. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, लक्ष्मीनारायण राठी, अजय शहा, प्रफुल मालानी, तनसुख झांबड, हरविंदरसिंग सलूजा, गुलाम हक्कानी आदींनी पैठण गेट, गुलमंडी आदी भागांत जाऊन व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले.
आवाहनानुसार दुकाने उघडली
जिल्हा व्यापारी महासंघाने केलेल्या आवाहनानुसार व्यापार्यांनी सकाळी प्रतिष्ठाणे उघडली; परंतु पोलिसांनी काही भागांत दुकाने बंद करण्यास भाग पाडली. काही भागांत दुकाने सुरू होती. पुढे लागणाऱ्या कडकडीत लॉकडाऊनसाठी व्यापाऱ्यांचे सहकार्य राहील. त्यासाठी दुकाने उघडण्याचे आवाहन केले होते. आता पुढील निर्णय घेतला जाईल.
- जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ