आडते-खरेदीदारांत तिढा

By Admin | Updated: August 28, 2016 00:18 IST2016-08-28T00:12:45+5:302016-08-28T00:18:59+5:30

हरी मोकाशे , लातूर शेतमाल खरेदी केलेले पैसे लवकर देण्याच्या कारणावरुन लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या आडते आणि खरेदीदारांत तिढा निर्माण झाला आहे़

In the shopping cart | आडते-खरेदीदारांत तिढा

आडते-खरेदीदारांत तिढा

हरी मोकाशे , लातूर
शेतमाल खरेदी केलेले पैसे लवकर देण्याच्या कारणावरुन लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या आडते आणि खरेदीदारांत तिढा निर्माण झाला आहे़ परिणामी शुक्रवारपासून बाजार समितीत सौदाच पुकारण्यात आलेला नाही़ त्यामुळे शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़ शनिवारी बैठक होऊनही आडते आणि खरेदीदारांत एकवाक्यता झाली नाही. त्यामुळे सोमवारीही बाजार बंद राहणार आहे़
कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतीमालावरील आडतवरुन गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत वारंवार तिढा निर्माण होत आहे़ त्यामुळे खरेदीदार शेतीमालाची खरेदी करीत नसल्याने त्याचा शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे़ राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतीमालावरील आडत ही शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून वसूल करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत़ त्यानुसार लातूरच्या बाजार समितीत आडत्यांकडून खरेदी केलेल्या शेतमालावरील आडत खरेदीदार देत होते़ दरम्यान, शेतमालापोटीचे पैसे खरेदीदार १० ते १२ दिवसांच्या कालावधीत आडत्यांना देत होते़ परंतु हे पैसे पाच ते सात दिवसांच्या कालावधीत देण्यात यावेत, अशी मागणी आडत व्यापाऱ्यांनी केली़ त्यास खरेदीदारांनी विरोध दर्शवीत शुक्रवारपासून शेतीमाल खरेदी करणे बंद केले़ त्यामुळे दोन दिवस शेतीमालाचा सौदाच पुकारण्यात आला नाही़
शहरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला भाव मिळतो म्हणून जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील आणि कर्नाटक व आंध्र प्रदेशातील शेतकरी आपला शेतीमाल आणतात़ सध्या खरीप हंगामातील मुगाच्या राशी सुरु आहेत़ त्यामुळे आवकही चांगली होत आहे़ परंतु, शेतीमालाचा सौदाच होत नसल्याने शेतकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे़
लातूरच्या बाजार समितीत एकूण १६०० आडत व्यापारी आहेत तर ५०० च्या जवळपास खरेदीदार आहेत़ त्यातील ७५० आडत व्यापारी आणि १०० च्या जवळपास खरेदीदार दररोज शेतीमालाची खरेदी-विक्री करतात़ दोन दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने दररोज होणारी उलाढालही ठप्प झाली आहे़
बाजार समितीतील व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून प्रयत्न सुरू असल्याचे सचिव मधुकर गुंजकर यांनी सांगितले़
लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाला चांगला दर मिळतो म्हणून शेतकरी मोठ्या आशेने शेतीमाल आणतात़ त्यामुळे सध्याची दररोजची उलाढाल ही पाच कोटींची आहे़ दोन दिवसांपासून बाजार समिती बंद असल्याने शेतीमालाची खरेदी-विक्री होऊ शकली नाही़ त्यामुळे दोन दिवसांत १० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे़
४दरम्यान, बाजार समिती दोन दिवसांपासून बंद असल्याने शनिवारी सायंकाळी ६ वाजता सभापती ललितभाई शहा यांच्या अध्यक्षतेखाली खरेदीदार- आडत व्यापाऱ्यांची बैठक झाली़ यावेळी उपसभापती मनोज पाटील, सचिव मधुकर गुंजकर, संचालक विक्रम शिंदे, संभाजी वायाळ, तुकाराम आडे, गोविंद नरहरे, तात्यासाहेब बेद्रे, बाळूसेठ बिदादा, सुधीर गोजमगुंडे, हर्षवर्धन सवई, व्यापारी पांडुरंग मुंदडा, हुकूमशेठ कलंत्री, अशोकशेठ अग्रवाल, आडत व्यापारी असो़चे अध्यक्ष अजिंक्य सोनवणे यांची उपस्थिती होती़ रात्री ८ वा़ पर्यंत चाललेल्या बैठकीदरम्यान, आडते व खरेदीदारांत समझोता झाला नाही़ त्यामुळे तिढा सुटू शकला नाही़ परिणामी, सोमवारीही बाजार समिती बंद राहणार आहे़
विदर्भात सव्वा रुपयांपासून ते पावणेदोन रुपयांपर्यंत आडत घेतली जाते़ तसेच शेतीमालाचे पैसे १२ ते १५ दिवसांच्या कालावधीत दिले जातात़ त्याचप्रमाणे आम्हालाही मुदत मिळणे गरजेचे आहे़ मात्र, आडत व्यापारी पाच ते सात दिवसांत पैसे द्या अशी भूमिका घेत आहेत़ त्यामुळे आम्ही शेतीमालाची खरेदीच शुक्रवारपासून बंद केली आहे़ १० दिवसांपर्यंत आम्ही पैसे देण्यास तयार असल्याचे श्री ग्रीन सीड अ‍ॅण्ड आॅईल मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पांडुरंग मुंदडा यांनी सांगितले़
शेतीमालाची खरेदी झाल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना पैसे देतो़ त्याचप्रमाणे आम्हालाही खरेदीदारांनी तत्काळ पैसे देणे आवश्यक असले, तरी पाच ते सात दिवसांत पैसे देण्याची लातूरच्या बाजार समितीतील परंपरा आहे़ त्यानुसार आम्ही पैसे मागत आहोत़ परंतु, खरेदीदार त्यास विरोध करीत १० दिवसांपर्यंत पैसे देऊ, असे सांगत आहेत़ आम्हाला ते परवडणारे नाही, असे आडत असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य सोनवणे यांनी सांगितले़

Web Title: In the shopping cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.