आराखड्यावर ‘दुकानदारी’
By Admin | Updated: January 12, 2016 00:07 IST2016-01-12T00:04:39+5:302016-01-12T00:07:15+5:30
औरंगाबाद : सुधारित विकास आराखडा सादर होताच शहरात अनेकांनी दुकानदारी सुरू केली आहे. आराखड्यात काही वसाहतींवर वेगवेगळी आरक्षणे पडली आहेत

आराखड्यावर ‘दुकानदारी’
औरंगाबाद : सुधारित विकास आराखडा सादर होताच शहरात अनेकांनी दुकानदारी सुरू केली आहे. आराखड्यात काही वसाहतींवर वेगवेगळी आरक्षणे पडली आहेत. ही आरक्षणे उठवून देण्याच्या नावाखाली स्थानिक नागरिकांकडून पैसे उकळण्याचा उद्योग काही जणांकडून सुरू आहे. बेघर होण्याच्या भीतीने हादरलेल्या नागरिकांकडून हजारो रुपये उकळले जात आहेत, तर काही जणांनी आरक्षणाच्या मुद्यावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न चालविला आहे.
मनपाच्या वाढीव हद्दीचा सुधारित विकास आराखडा पंधरा दिवसांपूर्वीच सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला. हा आराखडा राज्याच्या नगररचना खात्याकडून तयार करण्यात आला आहे. यामध्ये वाढीव हद्दीतील बहुतांश ग्रीन झोन येलो म्हणजे निवासी वापरासाठी परावर्तित करण्यात आले आहेत. तरीदेखील काही भागात नागरी वसाहतींवर वेगवेगळी आरक्षणे पडली आहेत.
त्यामुळे तेथील नागरिक हवालदिल झाले आहेत. त्याचाच फायदा घेत शहरात अनेक दलाल सक्रिय झाले आहेत. राजनगर, मुकुंदवाडी, जाधववाडी, हर्सूल, बंबाटनगर, भारतनगर, गारखेडा, अंबिकानगर आदी भागात हे दलाल फिरून आरक्षण उठवून देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे वसूल करीत आहेत.
शहरातील विविध भागातून आलेल्या शिष्टमंडळातील नागरिकांनीच सोमवारी महापौरांकडे अशा आशयाची तक्रार केली. त्यावर महापौरांनी या नागरिकांना कुणालाही पैसे न देण्याचे आवाहन केले. नागरिकांनी केलेल्या या तक्रारींमुळे शहरात दलालांकडून लूट सुरू असल्याची बाब समोर आली आहे.
सुधारित विकास आराखड्यातील आरक्षणांच्या मुद्यावरून शहरात राजकारणही जोमात सुरू आहे. मनपातील सत्ताधारी शिवसेनेने या मुद्यावर रान उठवून ते इनकॅश करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
४ वेगवेगळ्या भागात सेनेचे स्थानिक पुढारी फिरत असून लोकांना आरक्षणांची माहिती देत आहेत. त्यानंतर संबंधित भागात नागरिकांच्या बैठका घेऊन त्यांना धीर देण्याचे कामही सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे. काही भागात छोटीखानी सभा भरवून त्यात लोकांना आरक्षण बदलण्याचे आश्वासन दिले जात आहे.