दहा हजार झाडांची केली खरेदी
By Admin | Updated: September 7, 2014 00:29 IST2014-09-07T00:09:40+5:302014-09-07T00:29:53+5:30
परभणी : महानगरपालिकेने १० हजार ५०० झाडांची खरेदी करून मोहीम हाती घेतली आहे़

दहा हजार झाडांची केली खरेदी
परभणी : महानगरपालिकेने अर्धा पावसाळा सरल्यानंतर १० हजार ५०० झाडांची खरेदी केली असून, शहरामध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण करून मोहीम हाती घेतली जाणार आहे़
दरवर्षी पावसाळ्यामध्ये महानगरपालिका झाडांची खरेदी करून शहरातील विविध भागात वृक्षारोपण करते़ वृक्षारोपण चळवळीला गती देण्यासाठी मनपाच्या वतीने ही मोहीम राबविली जाते़ परंतु, यावर्षी महानगरपालिकेने सप्टेंबर महिन्यामध्ये झाडांची खरेदी केली असून, ही झाडे अर्ध्या किमतीत शहरवासियांना उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभय महाजन यांनी दिली़
यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे महानगरपालिकेने उशिराने झाडांची खरेदी केली, असेही सांगण्यात आले आहे़ प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोर किमान दोन झाडे लावावीत़ झाडे जोपासणाऱ्या व्यक्तीला महानगरपालिकेच्या वतीने आकर्षक बक्षिसेही दिली जाणार आहेत़ नगरसेवकांनी देखील वृक्षारोपण मोहीमेत सहभाग नोंदवून आपल्या प्रभागातील मोकळ्या जागेत तसेच रस्त्यावर शंभर झाडे लावावीत, मुख्य रस्त्यावर लावलेल्या झाडांना ट्री गार्ड उपलब्ध करून दिल्यास त्यास त्याचे नावही दिले जाणार आहे़ तसेच शहरातील शाळा, महाविद्यालयांनाही मनपाने पत्र पाठविले असून, विद्यार्थ्यांमार्फत किमान एक झाड लावण्याची विनंती केली आहे़ मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी या रोपांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली़ ही झाडे राजगोपालचारी उद्यानात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत़ (प्रतिनिधी)