४७ बचत गटांना स्वस्त धान्य दुकान
By Admin | Updated: July 3, 2014 00:22 IST2014-07-03T00:03:34+5:302014-07-03T00:22:51+5:30
नांदेड : जिल्ह्यात ४७ महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकान मंजूर करण्यात आले आहेत़ एकूण २०० दुकानांची मंजुरी प्रक्रिया जवळपास ८ महिन्यांपासून सुरू आहे़

४७ बचत गटांना स्वस्त धान्य दुकान
नांदेड : जिल्ह्यात ४७ महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकान मंजूर करण्यात आले आहेत़ एकूण २०० दुकानांची मंजुरी प्रक्रिया जवळपास ८ महिन्यांपासून सुरू आहे़ ज्या ठिकाणी महिला बचत गटांचे अर्ज प्राप्त झाले नाहीत तिथे स्वयंसहायता गटांना दुकाने देण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले़
राज्यशासनाने ३ जानेवारी २००६ चा निर्णय रद्द करून ३ नोव्हेंबर २००७ च्या शासन निर्णयानुसार रास्त भाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने स्वयंसहायता गटांना देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांच्याकडून परवाने नसलेल्या गावांची माहिती मागविण्यात आली आहे़ जिल्हा पुरवठा विभागाने पहिल्या टप्प्यात २०० रास्त भाव दुकानांचे परवाने देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे़ पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ४७ महिला बचत गटांना जिल्हा पुरवठा विभागाने परवाना बहाल केला आहे़ उर्वरित दुकानांच्या परवानासाठी एकापेक्षा जास्त महिला बचत गटाचे अर्ज आल्याने तसेच तक्रारी आल्याने परवाना बहालची प्रक्रियेबाबत सुनावणी सुरू आहेत़ ग्रामसभेत मतदान घेवून महिला बचत गटांना परवाना दिला जात आहे़ तर शहरी भागातील २० भागात वार्डसभेद्वारे बचत गटांची निवड होणार आहे़
ज्या ठिकाणी परवाना घेण्यासाठी अर्ज आले नाहीत तिथे आता स्वयंसहायता गटांना स्वस्त धान्य दुकाने देण्यात येणार आहेत़ ४ जुलै २०१४ रोजी ज्या त्या गावात तलाठ्यामार्फत चावडी व ग्रामपंचायतीत जाहीर प्रगटन प्रसिध्द करण्यात येणार आहे़ तसेच दवंडीद्वारे माहिती दिली जाणार आहे़
नवीन रास्त भाव दुकाने मागणी संदर्भातील अर्जांची विक्री तहसीलच्या सेतू सुविधा केंद्रामार्फत केली जाणार आहे़ १९ जुलैपर्यंत तहसील कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत़ (प्रतिनिधी)