कळमनुरीत साकारणार शूटींग रेंज प्रशिक्षण केंद्र
By Admin | Updated: September 12, 2014 00:04 IST2014-09-12T00:00:15+5:302014-09-12T00:04:25+5:30
हिंगोली : मराठवाड्यातील पहिले शासकीय रायफल प्रशिक्षण केंद्र कळमनुरीत मंजूर करण्यात आले आहे.

कळमनुरीत साकारणार शूटींग रेंज प्रशिक्षण केंद्र
हिंगोली : मराठवाड्यातील पहिले शासकीय रायफल प्रशिक्षण केंद्र कळमनुरीत मंजूर करण्यात आले आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ४५ लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खा. राजीव सातव यांनी दिली.
जिल्ह्यासाठी नव्याने मंजूर झालेले हे केंद्र मोठी उपलब्धी आहे. अनेक वर्षांपासून रायफल प्रशिक्षण केंद्राच्या मागणीच्या अनुषंगाने
खा. सातव यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांची भेट घेतली. पुढे रायफल शूटींग रेंज प्रशिक्षण केंद्राच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केल्यानंतर कळमनुरीत या प्रशिक्षण केंद्रास मान्यता मिळाली. कळमनुरीतील तालुका क्रीडा संकुलात हे केंद्र कार्यान्वित होईल. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मराठवाड्यातील हे पहिलेच शासकीय प्रशिक्षण केंद्र आहे. जिल्ह्यात नेमबाजी करणाऱ्या खेळाडूंसाठी हे केंद्र मंजूर झाल्याने प्रशिक्षणाच्या अडचणी आता दूर होणार आहेत. पूर्वी प्रशिक्षणासाठी इच्छुकांना बाहेरगावी जावे लागत होते. त्यात वेळ व पैशांचा अपव्यय होत होता; परंतु आता जिल्ह्यात हक्काचे प्रशिक्षण केंद्र झाल्याने नेमबाजांना येथेच मोठी संधी उपलब्ध झाली. पोलीस भरती, राज्य राखीव दलाच्या भरतीत खेळाडुंना राखीव जागा असल्याने नेमबाजांनासुद्धा पुढील काळात उपयोग होईल. जिल्ह्यातून राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविले जावेत, या दृष्टीने प्रशिक्षण केंद्रास मंजुरी मिळाली आहे. हिंगोली लोकसभा क्षेत्रातील खेळाडुंसाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. सातव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)