शिऊर : आमच्या मुलीला नांदवत का नाहीस, असे म्हणून सासू, सासरे, मामेसासरे व पत्नीने त्रास दिल्याने एका जावयाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी वैजापूर तालुक्यातील भोकरगाव येथे घडली. याप्रकरणी सदरील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिक नारायण लंबे (वय २३, रा. भोकरगाव) असे मयताचे नाव आहे.
मयत कार्तिक लंबेचा भाऊ गणेश लंबे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की, कार्तिक आणि रुचा या दोघांचा विवाह ४ एप्रिल २०२४ मध्ये झाला. विवाहानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे रुचा माहेरी निघून जात असे. त्यानंतर कार्तिकचे सासू, सासरे, पत्नी व मामेसासरे हे कार्तिकला यामुळे नेहमी धमकी देत होते. अशातच काही दिवसांपूर्वी वरील आरोपींनी शेत वस्तीवर येऊन कार्तिकसह कुटुंबीयांना शिवीगाळ केली. आम्ही याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो होते, मात्र ग्रामस्थांनी हे प्रकरण मिटविले. त्यानंतर शनिवारी (दि.२८) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बाबासाहेब त्रिंबक सोनवणे (रा. खरज) यांनी फोन करून धमकी दिली.
यामुळे घाबरलेल्या कार्तिकने रविवारी सकाळी गळफास घेऊन शेतबांधावर आत्महत्या केली. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात कार्तिकची पत्नी रुचा कार्तिक लंबे, साईनाथ प्रल्हाद सोनवणे व त्यांची पत्नी, पवन साईनाथ सोनवणे, (सर्व रा. भादली) मामेसासरे बंडू पवार, विजय पवार व बंडू पवार यांचा मुलगा (तिघे रा. चापानेर), चुलत सासरे बाबासाहेब त्र्यंबक सोनवणे (रा. खरज) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.