धक्कादायक... दोन टक्के महिलाच कर्करोगाच्या पहिल्या स्टेजला रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST2021-02-05T04:21:44+5:302021-02-05T04:21:44+5:30
संतोष हिरेमठ लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : कर्करोग म्हटला की, अनेकांच्या अंगावर काटा येतो. पण ७० टक्के कर्करोग हा ...

धक्कादायक... दोन टक्के महिलाच कर्करोगाच्या पहिल्या स्टेजला रुग्णालयात
संतोष हिरेमठ
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कर्करोग म्हटला की, अनेकांच्या अंगावर काटा येतो. पण ७० टक्के कर्करोग हा प्रतिबंधात्मक आहे. त्यासाठी वेळीच निदान, उपचार होणे गरजेचे आहे. मात्र, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या उपचारासाठी केवळ २ टक्के महिला पहिल्या स्टेजमध्ये रुग्णालयात दाखल होतात तर तब्बल ९८ टक्के महिला दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या म्हणजे अॅडव्हान्स स्टेजमध्ये दाखल होत आहेत. त्यातही ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण अधिक असल्याची धक्कादायक बाब शासकीय कर्करोग रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या एका अभ्यासातून समोर आली.
दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. शासकीय कर्करोग रुग्णालयातील स्त्री कर्करोग विभागप्रमुख डॉ. वर्षा देशमुख आणि डॉ. अर्चना राठोड यांनी गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील उपचारासाठी महिला उशिरा का येतात, त्याची काय कारणे आहेत, याचा अभ्यास केला. तेव्हा ९८ टक्के महिला उपचारासाठी उशिरा येत असल्याचे आढळून आले.
महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची स्क्रिनिंग करणे अतिशय सोपे आहे. मात्र, तरीही कर्करोगाची वाढ होईपर्यंत महिला रुग्णालयापर्यंत पोहोचत नाहीत. डॉ. वर्षा देशमुख म्हणाल्या, गाव, तालुका पातळीवर स्क्रिनिंग होऊन उपचारासाठी महिलांना वेळीच रुग्णालयात पाठवले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली २०१८पासून ‘जागो औरंगाबाद’ ही कर्करोग जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
लवकर लग्न, स्वच्छतेकडे दुर्लक्ष
ग्रामीण भागात एक लाख महिलांमागे ३५ महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोग आढळतो. तर शहरात हेच प्रमाण एक लाखामागे ७ आहे. ग्रामीण भागात कमी वयात होणारी लग्न, पाण्याचा अभाव, स्वच्छतागृहांचा अभाव यामुळे शारीरिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष होणे, कुपोषण, अधिक मुले या बाबी हा कर्करोग होण्यास कारणीभूत ठरतात. ७० टक्के कर्करोग हा प्रतिबंधात्मक आहे. त्यासाठी वर्षातून एकदा तपासणी करून घेणे गरजेचे आहे, असे डॉ. अर्चना राठोड म्हणाल्या.
---
गेल्या ५ वर्षात ११,२५५ गर्भाशय मुखाचे कर्करोग रुग्ण.
--
उपचारासाठी रुग्णालयात उशिरा येण्याची कारणे
१) आर्थिक अडचण - २३ टक्के
२) निर्णय क्षमता नसणे - १७ टक्के
३) कोणीही लक्ष न देणे - १९ टक्के
४) लज्जास्पद वाटणे - १० टक्के
५) स्थानिक डॉक्टरांकडून निदान न होणे - २२ टक्के
६) लक्षणे माहीत नसणे - ११ टक्के
--
फोटो ओळ...
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णासह शासकीय कर्करोग रुग्णालयातील डॉक्टर्स.