औरंगाबाद : प्रियकरासोबतचे फोटो व्हायरल केल्याबद्दल पती व दिराविरुद्ध, तर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा प्रियकराविरुद्ध दाखल करण्याची मागणी करीत विवाहितेने पोलिसांना आत्महत्येची धमकी दिली. अखेर चार पोलीस ठाणे फिरल्यानंतर एका ठाण्यात फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
एका २० वर्षीय विवाहितेचे मागील २-३ वर्षांपासून एका तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू होते. तरीही तिने सेव्हन हिल भागातील एका तरुणासोबत विवाह केला. एके दिवशी ती पतीचा मोबाइल घेऊन प्रियकरासोबत खुलताबाद येथे फिरायला गेली. त्यावेळी तिने प्रियकरासोबत मोबाइलमध्ये फोटो काढले व नंतर ते डिलीटही केले. तत्पूर्वी, या प्रकरणाची भनक पतीला लागली होती. त्यामुळे त्याने मोबाइलमधून डिलीट केलेले फोटो रिकव्हर केले व ते तिच्या मामासह इतर नातेवाइकांच्या मोबाइलवर व्हायरल केले. या घटनेमुळे पती-पत्नीमध्ये वाद झाला.
विवाहितेने क्रांतीचौक ठाणे गाठून पती व दिराने प्रियकरासोबतचे फोटो नातेवाइकांच्या मोबाइलवर व्हायरल केले म्हणून, तर प्रियकराविरुद्ध अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. क्रांतीचौक पोलिसांनी या विवाहितेला सुरुवातीला जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. विवाहितेने जिन्सी पोलीस ठाणे गाठले; पण सेव्हन हिलमधील भाग जिन्सी पोलिसांच्या हद्दीत नसल्याने तिला पुंडलिकनगर पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिला. पुंडलिकनगर पोलिसांनी प्रियकराविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करायचा असेल, तर खुलताबाद पोलिसांशी संपर्क साधा, असे सांगितले. म्हणून तिने खुलताबाद पोलीस ठाणे गाठले.
पुढे खुलताबाद पोलिसांनी तिला मूळ प्रकरण औरंगाबादेतून सुरू झाल्याने तेथेच तक्रार देता येईल, असे सांगून पाठवून दिले.चार पोलीस ठाणे फिरल्यानंतर पुन्हा या विवाहितेने नजीकचे क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठले. क्रांतीचौक पोलिसांना गुन्हा दाखल करा; अन्यथा येथेच आत्महत्या करते, अशी धमकी दिल्यामुळे पोलिसांना नाइलाजास्तव पती व दिराविरुद्ध फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा लागला. या प्रकारानंतर हा गुन्हा पुंडलिकनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.