बिडकीन : येथील पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्यास एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ती महिलेने सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मारहाण केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजिया रियाज शेख (वय ३८, रा. बिडकीन) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
बिडकीन पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास महिला पोलिस कर्मचारी समीना शेख या सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास संगणकावर काम करीत असताना स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ती रजिया शेख या पोलिस ठाण्यात आल्या. त्यांनी पोलिस कर्मचारी समीना शेख यांच्याशी चर्चा करताना वाद सुरू केला. यावेळी समीना शेख यांनी त्यांना बाजूला बसण्यास सांगितले असता राग अनावर झाल्याने रजिया शेख यांनी त्यांच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण केली. यावेळी झालेल्या झटपटीत समीना शेख यांच्या गळ्यातील दोन ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. इतर कर्मचाऱ्यांनी सोडवासोडव केल्यानंतर त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली व सरकारी कामात अडथळा आणला. या मारहाणीत समीना शेख या जखमी झाल्या असून त्यांच्यावर बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी त्यांनी मंगळवारी सकाळी दिलेल्या फिर्यादीवरून रजिया शेख यांच्याविरुद्ध बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन दिवसांची पोलिस कोठडीयाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी सकाळीच पोलिसांनी आरोपी रजिया शेख यांना त्यांच्या घरातून अटक केली. त्यानंतर त्यांना पैठण येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलबिडकीन पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचाऱ्यास महिलेने मारहाण केल्याची घटना घडली, त्यावेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने ठाण्यातील सीसीटीव्ही बंद होते; मात्र तिथे उपस्थित एकाने या घटनेचे चित्रीकरण केले व ते एका व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट केल्यानंतर याबाबतचा व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला.