छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील मौजे खंमाटवस्ती, पाथ्री येथे ३० महिने, ९ वर्षे आणि ११ वर्षे वयाच्या ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. या प्रकरणानंतर आरोग्य यंत्रणेने गावात सर्वेक्षणासह विविध खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या.
सर्वप्रथम ९ वर्षीय मुलाला १२ जुलैला अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा आला. आधी गावात उपचार घेतले. प्रकृती खालावत असल्याने मुलाला छत्रपती संभाजीनगरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर १६ जुलैला ११ वर्षीय मुलालाही अचानक अशक्तपणा आल्याने त्यालाही उपचारासाठी दाखल केले. तर, ३० महिन्यांच्या बालकाला १७ जुलैला असाच त्रास सुरू झाल्याने त्यालाही उपचारासाठी भरती करावे लागले. दोन मुलांवर ‘पीआयसीयू’त आणि ३० महिन्यांच्या बालकावर जनरल वॉर्डात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे वडोदबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या खंमाटवस्ती, पाथ्री येथे सर्वेक्षण हाती घेण्यात आले.
पाण्याचा वापर थांबविलागावात पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हे सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणेचे नळ आहे. ते पाणी तूर्त पिण्यास न वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या. शुद्ध आणि निर्जंतुक केलेले पाणी पुरविण्यात येत असल्याची माहिती जि.प.च्या आरोग्य विभागाने दिली.
आरोग्य विभागाने केली ‘अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस’ म्हणून नोंदया मुलांची आरोग्य विभागाने ‘अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस’ (एएफपी) संशयित रुग्ण म्हणून नोंद केली आहे. ‘अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस’ची स्थिती ही पोलिओ, गुलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजारासह अन्य काही आजारांमध्ये आढळते.
तपासणीसाठी नमुने ‘एनआयव्ही’लासध्या ही मुले ‘अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस’ संशयित आहेत. त्याची कारणे अनेक आहेत. तिन्ही मुलांचे ‘स्टूल’ नमुने तपासणीसाठी ‘एनआयव्ही’ला पाठविले आहेत. त्याबरोबरच सदरील गावात विस्तृत सर्वेक्षणही करण्यात येत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी म्हटले.