थकबाकीदारांना महावितरणचा शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:42 IST2017-11-09T00:42:40+5:302017-11-09T00:42:44+5:30
थकबाकीदार कृषीपंप वीज ग्राहकांच्या वसुली मोहिमेनंतर आता नांदेड परिमंडळातील थकबाकीदार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांचाही वीजपुरवठा खंडित करण्याची महामोहीम सुरु करण्यात आली आहे.

थकबाकीदारांना महावितरणचा शॉक
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: थकबाकीदार कृषीपंप वीज ग्राहकांच्या वसुली मोहिमेनंतर आता नांदेड परिमंडळातील थकबाकीदार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांचाही वीजपुरवठा खंडित करण्याची महामोहीम सुरु करण्यात आली आहे. सप्टेंबर २०१७ अखेर नांदेड परिमंडळात ७ लाख २३ हजार ७९३ वीज ग्राहकांकडे ४४ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे.
महावितरणची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व वर्षानुवर्षे थकबाकीचा वाढत जाणारा डोंगर कमी करण्याच्या हेतूने महावितरणने सर्वच स्तरावर थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची महामोहीम सुरु केली आहे. नांदेड परिमंडळातील नांदेड जिल्ह्यामधील ४ लाख २४ हजार २३० वीज ग्राहकांकडे ३१ कोटी ५६ लाख रुपयांची थकबाकी आहे. तसेच परभणी जिल्ह्यात १ लाख ८९ हजार १७५ वीज ग्राहकांकडे १२ कोटी १८ लाख तर हिंगोली जिल्ह्यातील १ लाख १० हजार ३८८ वीज ग्राहकांकडे ५७ लाख रुपये थकबाकी आहे.
मंगळवारपासून सुरु झालेल्या या वसुलीच्या महामोहिमेत नांदेड जिल्ह्यातील ३७६ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला़ तर १८५१ वीज ग्राहकांनी ३५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. तसेच, परभणी जिल्ह्यातील ७५ वीज ग्राहकांची वीज कापण्यात आली तर ८७ वीज ग्राहकांनी ८ कोटी ८२ लाख रुपयांचे वीजबिल महावितरणच्या खात्यात जमा केले. नांदेड परिमंडळामध्ये काल व आज केलेल्या कारवाईत एकूण ४५१ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला तर १९४८ वीज ग्राहकांनी ९ कोटी १७ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी जमा केली आहे.
वीज ग्राहकांपर्यंत एक युनिट वीज पोहोचवण्यासाठी जेवढा खर्च येतो त्याच्या अर्धीही रक्कम वीजग्राहकाकडून वसूल होत नाही. त्यामुळे वीजबिल थकबाकीची समस्या वाढतच चाललेली आहे. वीजबिल भरण्याकरिता महावितरणने इंटरनेट बँकिंग, मोबाईल यासह अनेक विकल्प निर्माण केलेले आहेत. या विकल्पांचा वापर करत वीजग्राहकांनी देय तारखेच्या आत वीजबिल भरुन महावितरणला सहकार्य करावे, अन्यथा वीज खंडित करण्याच्या कटू कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांनी केले आहे़