बसच्या धडकेत चिमुकला ठार
By Admin | Updated: May 9, 2015 00:53 IST2015-05-09T00:42:56+5:302015-05-09T00:53:22+5:30
उमरगा : लग्न आटोपून गावाकडे परतत असताना मोटारसायकलला एसटीने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चिमुकला जागीच ठार झाला

बसच्या धडकेत चिमुकला ठार
उमरगा : लग्न आटोपून गावाकडे परतत असताना मोटारसायकलला एसटीने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चिमुकला जागीच ठार झाला तर तिघे जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील नागराळ (तुगाव) येथील व्यंकट शंकर तेलंग हे मोटारसायकल (क्र. एमएच.१२/सीझेड ९१४१) वरून किल्लारी येथे लग्न सोहळ्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची मुले, ऋषिकेश, रोहिणी व रुपाली हेही मोटारसायकलवर होते. लग्न समारंभ आटोपून ते नागराळकडे येत असताना समोरून येणाऱ्या उमरगा-तावशी बस (क्र. एमएच२०-बीसी२०४६) च्या चालकाने बस निष्काळजीपणे चालवून व्यंकट तेलंग यांच्या मोटारसायकलीस जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील ऋषिकेश तेलंग (वय ७) हा चिमुकला जागीच ठार झाला. तर व्यंकट तेलंग (वय ४२) व रोहिणी (वय १४) आणि रुपाली (वय १३) ही दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत.
व्यंकट व रोहिणी यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, रुपाली तेलंग हिला एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने तातडीची मदत करून जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याने जखमीवर तात्काळ उपचार करणे शक्य झाले. या प्रकरणी गुन्हा नोंदविल्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. तपास पोना दिगंबर सूर्यवंशी करीत आहेत. (वार्ताहर)