महेश नवमीनिमित्त आज शोभायात्रा
By Admin | Updated: June 13, 2016 00:48 IST2016-06-13T00:40:03+5:302016-06-13T00:48:24+5:30
औरंगाबाद : माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश उत्सव साजरा केला जात आहे. सोमवारी १३ जूनला महेश नवमीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

महेश नवमीनिमित्त आज शोभायात्रा
औरंगाबाद : माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश उत्सव साजरा केला जात आहे. सोमवारी १३ जूनला महेश नवमीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. याशिवाय खडकेश्वर मंदिरात रुद्राभिषेक, कार डेकोरेशन स्पर्धा, रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
महेश नवमीनिमित्त माहेश्वरी समाजाच्या वतीने खडकेश्वर महादेव मंदिरात सकाळी ७ वाजता रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. दुपारी २ ते ४ वाजेदरम्यान कार डेकोरेशन स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा खडकेश्वर मंदिराच्या मैदानात घेण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कार सजावटीतून राष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्यात येणार आहे. या सर्व सजविलेल्या कार शोभायात्रेत सहभागी होणार आहेत.
रक्तदान महान दान असल्यामुळे महेश नवमीचे औचित्य साधून तापडिया नाट्यमंदिरात दुपारी ४ वाजेपासून रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. महेश नवमीचे मुख्य आकर्षण असणारी शोभायात्रा दुपारी ४ वाजता खडकेश्वर मैदानापासून निघणार आहे. यात विविध सजीव, निर्जीव देखाव्यांचा समावेश असणार आहे.
खडकेश्वर मैदानापासून शोभायात्रा सुरू होऊन नागेश्वरवाडी, बाळकृष्ण मंदिर, जिल्हा परिषद, औरंगपुरामार्गे निराला बाजार येथे तापडिया नाट्यमंदिरात पोहोचणार आहे.
विविध उपक्रम व शोभायात्रेत समाजबांधवांनी हजर राहावे, असे आवाहन माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष अनिल सोनी यांनी केले आहे.