मुंडेंचे छायाचित्र वापरत शिवसेनेची खेळी !
By Admin | Updated: October 8, 2014 00:53 IST2014-10-08T00:23:08+5:302014-10-08T00:53:33+5:30
प्रताप नलावडे , बीड उध्दव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या निमित्ताने बीड शहरात लावण्यात आलेल्या पोस्टर्स आणि डिजिटलवर गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र झळकावून सेनेने एक वेगळीच खेळी केली आहे.

मुंडेंचे छायाचित्र वापरत शिवसेनेची खेळी !
प्रताप नलावडे , बीड
उध्दव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या निमित्ताने बीड शहरात लावण्यात आलेल्या पोस्टर्स आणि डिजिटलवर गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र झळकावून सेनेने एक वेगळीच खेळी केली आहे. त्यांच्या छायाचित्राचा वापर केल्याने भाजपाची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली आहे.
भाजपाचा केवळ बीडमधीलच नव्हे तर राज्यातील प्रचार गोपीनाथ मुंडे यांच्या भोवतीच फिरताना दिसत आहे. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या भावनिक लाटेचे माप आपल्याच पदरात पडावे, यासाठी भाजपाने बीड जिल्ह्यात तरी योग्य ती खबरदारी घेतली आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतही मोदी यांनी वारंवार मुंडे यांचे स्मरण करून देत भावनिक साद उपस्थितांना घातली.
पंकजा मुंडे यांनीही आपल्या भाषणातून या जगाला आपण मुंडे यांचे नाव विसरू देणार नाही, असे सांगत आपण आता त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच राजकारणात सक्रिय असल्याचे सांगितले.
हे सगळे सुरू असतानाच शिवसेनेने गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र डिजिटलवर झळकावून भाजपालाच बुचकुळ्यात टाकण्याचे काम केले आहे. त्यातही आज सकाळपासून या छायाचित्राची चर्चा सुरू असतानाच उध्दव ठाकरे यांच्या सभेच्यावेळी व्यासपीठावरही गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा ठेऊन सेना आणि मुंडे यांच्या ऋणानुंबधाची आठवण लोकांना करून दिली. त्यांच्या सभेच्या व्यासपीठावर शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मुंडे यांचे पुतळे आवर्जून ठेवण्यात आले होते.
ठाकरे यांनीही आपल्या भाषणात मुंडे असते तर युती तुटली नसती, असे सांगत ठाकरे आणि मुंडे यांचे कौटुंबिक संबंध पाहता आपण जाणीवपूर्वक परळी विधानसभा मतदारसंघात आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार दिला नसल्याचे सांगितले. पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे यांनी विजयी व्हावे, अशीच आपली मनोमन इच्छा असल्याची टिपण्णीही उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केली.